Breaking News

स्टेडियम वेधतेय क्रीडारसिकांचे लक्ष

बलुचिस्तान : वृत्तसंस्था
क्रिकेटचे मैदान सहसा अशा एखाद्या ठिकाणी असते जिथून काही अफलातून दृश्य पाहता येतात. जगभरात अशी अनेक क्रिकेटची मैदाने आहेत. भारतातही धरमशाला येथील क्रिकेट स्टेडियम, मरिन ड्राईव्हपाशी असणारं मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम ही त्यापैकीच काही नावे. तिथे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्सलाही विसरून चालणार नाही. आता याच यादीमध्ये समावेश होणार आहे ते म्हणजे बलुचिस्तानमधील अतिशय सुरेख असे गवादर क्रिकेट स्टेडियम.
सोशल मीडियावर फक्र-ए-आलम या ट्विटर अकाऊंटवरून गवादर क्रिकेट स्टेडियमचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. ज्यामघ्ये अतिशय रुक्ष पण त्यातही निसर्गसौंदर्याची वेगळी परिभाषा मांडणार्‍या एका स्थळाबाबतची माहिती मिळत आहे. ओसाड आणि निर्मनुष्य पर्वतरांगांमध्ये साकारण्यात आलेले गवादर क्रिकेट स्टेडियम हे सध्याच्या घडीला अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनेही (आयसीसी) ट्विटरवरून या स्टेडियमचे काही फोटो शेअर केले आहेत. याहून अधिक सुंदर अशा क्रिकेट स्टेडियमचे फोटो दाखवा, आम्ही वाट पाहतोय, असे आयसीसीने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
खडकाळ पर्वतरांगांमध्ये हिरव्यागार गालीचाप्रमाणे हे स्टेडियम बलुचिस्तानमध्ये क्रिकेट खेळाडूंच्या प्रतीक्षेत सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरैज शम्सी यानेही या स्टेडियमचे सौंदर्य पाहून अवाक् झाल्याची प्रतिक्रिया दिली. या सुरेख स्थळावर आपण तिसरा टी-20 सामना आयोजित करू शकतो का, असा प्रश्न करीत त्याने न्यूलँड्स, धरमशाला आणि गवादर स्टेडियम ही आपली सर्वांत आवडीची क्रिकेट मैदाने असल्याचे सांगितले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply