मुरुड : प्रतिनिधी
मुरुड तालुक्याला वादळाचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. सकाळी अकरा पासून वादळी वारे व पाऊस सुरू झाला तो नुकसान करीतच गेला ताशी 160 किलोमीटरच्या जोरदार वार्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान होऊन लोकांना मोठा आर्थिक आघात सोसावा लागला आहे
आगरदांडा येथील समुद्रात वादळ होणार म्हणून राजपुरी येथील लोकांनी आपल्या सहा सिलेंडर असणार्या मोठ्या बोटी आगरदांडा येथील बंदरात साकारून ठेवल्या होत्या परंतु या वादळी वार्याने येथील 20 बोटींचे मोठे नुकसान केले आहे.
मुरुड शहरातील मासळी मार्केटच्या मागे मासळी विक्री साठी लिलाव करण्यासाठी मोठे पत्र्याच्याया शेडची उभारणी करण्यात आली होती परंतु या वादळात ही शेड भुईसपाट झाली आहे
नांदगाव मुरुड सर्वे काशीद येथील मोठं मोठ्या सुपारी व नारळाच्या वृक्षांच्या बाग आहेत परंतु वेगाने वाहणार्या या वार्याने सर्व सुपारीचे झाडे उन्मळून पाडून वादळाची ताकद दाखवून दिली आहे तर मोठमोठी नारळाची झाडे मुळासकट पडल्याने येथील बगायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बागायतदार मोठे चिंतेत पडले असून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.
वादळ होण्याच्या आदल्या दिवशी महसूल प्रशासनाने मुरुड तालुक्यातील सुमारे 3450 लोकांना धोक्याच्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते त्यामुळे मुरुड तालुक्यात एकही जीवित हानी झाली नाही परंतु मालमतेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पोलादपुरात व्यवहार ठप्प
पोलादपूर : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाचा फटका पोलादपूर तालुक्यालाही बसला. यामुळे येथील जनजीवन ठप्प झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी चक्रीवादळाला सुरुवात झाल्यानंतर पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यावर शिवाजीनगर व गाडीतळ दरम्यान एक महाकाय वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प झाली. कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहाचे क्राँक्रीटचे पत्रे आणि सोलर गिझर संयत्र वादळात छिन्नविछिन्न झाले. श्रीदेवी गंगामाता सभागृहाचे छप्परही क्षतीग्रस्त झाले तर सिध्देश्वर आळीतील विजय पवार यांच्या घरासमोरील काँक्रीटच्या रस्त्यावर एका इमारतीवरील लोखंडी पत्र्याचे छप्पर येऊन कोसळले. पंचायत समितीच्या एका इमारतीचे पत्रेदेखील उडाले. शिवाजीनगर मधील सुकाळे यांच्या इमारतीचे लोखंडी पत्र्याचे छप्पर कोसळले. आनंदनगर, भैरवनाथ नगर, गोकुळ नगर, सह्याद्रीनगर, बाजारपेठ, गाडीतळ येथील अनेक घरांचे काँक्रीट व गैल्वेनाईज्ड पत्रे उडाले आणि झाडांच्या फांद्याही कोसळल्या.कशेडी घाटातील कातळी बंगला येथील कोविड 19 तपासणी नाका हा वादळीवार्यासह पावसात उदध्वस्त झाला.