Breaking News

चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे सुरू

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

पेण ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळानंतर आता पेण तालुक्यात उद्भवलेल्या विदारक परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. स्थानिक प्रशासनाने आपले पंचनामे दुसर्‍या दिवसापासून करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपर्यंत जवळपास दीड हजार नुकसानीचे पंचनामे झाले असून साधारणपणे चार ते पाच हजार नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या घरांचे पंचनामे करावे लागतील, असा अंदाज तहसीलदार अरुणा जाधव यांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक प्रशासनाने चक्रीवादळापूर्वीच सावधानता बाळगून नागरिकांना सतर्क केल्याने आणि नागरिकांनीदेखील दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने तालुक्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये झाडे उन्मळून पडणे, विजेचे पोल पडणे, विद्युत डीपी पडणे, घरांचे  पत्रे उडणे असे नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याला मदत निधी मंजूर केला आहे. त्याप्रमाणे शासनाचे ज्याप्रमाणे आदेश येतील त्याप्रमाणे पंचनामे करण्यात येणार आहेत. शहरातील काही गणपती कारखानदारांचे नुकसान झाले आहे. त्यांचासुद्धा प्रस्ताव पाठवून जे आदेश येतील त्याप्रमाणे त्यांचेदेखील पंचनामे करण्यात येणार आहेत, मात्र मागील तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने काही अधिकार्‍यांचे मोबाइल बंद पडणे आणि चक्रीवादळामुळे नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने जे अधिकारी पंचनामे करण्यास येतील त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अरुणा जाधव यांनी केले आहे.

पेण तालुक्यातील शिहू, वडखळ भागात विद्युत पुरवठा सुरू व्हायला अजून अवधी जाईल, तर तालुक्यातील इतर भागात टप्प्याटप्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. शहरी भागातील विद्युत पुरवठा लवकरच सुरू होईल, असेही तहसीलदारांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply