Breaking News

मुरूड तालुक्यात शिवसेनेला अनुकूल वातावरण

रायगड लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यातील रंगणार्‍या सामन्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. मुरूड तालुक्यात शिवसेनेला अनुकूल असे वातावरण असल्याचा दावा पक्षाचे कार्यकर्ते करू लागले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता मुरूड तालूक्यातून 62 हजार 263 मतदार असून, त्यामध्ये दिव्यांग मतदार संख्या 480 आहे. त्यामध्ये महिला 169, तर पुरुष 311 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, तर रायगड जिल्हातून 16 लाख 37 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मुरूड तालुक्यातून मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून यामध्ये 30 हजार 815 पुरुष, तर 31 हजार 448 महिला मतदार हक्क बजावणार आहेत. रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे व युतीचे अनंत गीते यांच्यातच सरळ लढत होणार आहे. मागील निवडणुकीत तटकरे विरुद्ध गीते असाच सामना रंगला होता. 15 लाख 13 हजार मतदारांमधून गीतेंना अवघ्या दोन हजार 110 मतांनी विजय मिळवता आला होता. आता पाच वर्षानंतर यात अनेक बदल झालेले आहेत. सलग सातव्यांदा लोकसभेवर जाण्याची संधी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमोर असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील तटकरे याना यंदाच्या निवडणुकीत भरपूर बॅडपॅचला सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होऊनसुद्धा त्यांना या पक्षात टिकवता न आल्याने अवघ्या काही दिवसांतच ते स्वगृही म्हणजेच शिवसेनेत सक्रिय झाल्याने खूप मोठ्या समस्येने सामोरे जावे लागणार आहे. यातच पेणचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने पेण मतदारसंघातून गीते यांना भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यामुळे मतात वाढ होणार आहे.

रायगड लोकसभा भागात सर्वाधिक कुणबी समाजाची खूप मोठी मतदार संख्या असल्याने आपल्या जातबांधव मतदाराची मने वळवण्यात ते यशस्वी झाले असून या वाढत्या पाठिंब्यामुळे गीते यांचे पारडे जड असून रायगड लोकसभा भागातील भारतीय जनता पार्टीच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने याचा मोठा फायदा गीते यांना होताना दिसणार आहे. गीते यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही ही त्यांच्या जमेची बाजू असून सुशिक्षित नागरिकांमध्ये त्यांचे खास वलय आहे. शांत स्वभाव व सर्वांना सहकार्य करण्याची त्यांची प्रवृत्ती यामुळे एक वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.

खासदारकीची निवडणूक राष्ट्रीय धोरणाला मानणारी असल्याने संपूर्ण कोकणात लोक वेगळ्या पद्धतीने विचार करून भारभक्कम मतांचा पाठिंबा गीते यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या युतीमुळे गीते यांना सातव्यांदा निवडून येण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे.

मुरूड तालुक्यात भारतीय जनता पक्षाने स्वबळावर ग्रामपंचायती निवडणूक लढवल्या आहेत. त्यामुळे मुरूड तालुक्यात भारतीय जनता पक्ष अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या मेहनतीमुळे चांगले मताधिक्य तयार झाले आहे. मुरूड तालुक्यातील मिठेखार, तळेखार या ग्रामपंचायती स्वबळावर जिंकण्यात आलेल्या आहेत, तसेच राजपुरी, नांदगाव, उसरोली व तालुक्यातील बहुसंख्य भागात मोठे मतदार तयार झाले असून मुरूड तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे उत्कृष्ट सहकार्य लाभल्यास मुरूड तालुक्यातून गीते यांना मोठा लीड या तालुक्यातून मिळणार आहे. याशिवाय मुरूड नगर परिषद यावर शिवसेनेचे बहुमत आहे.

मुरूड नगर परिषदेवर शिवसेनेचे नऊ व एक अपक्ष नगरसेवक असे एकून 10 नगरसेवक व थेट नगराध्यक्ष असल्याने मुरूड शहरातून सुद्धा मोठा लीड मिळण्यास कोणतीही अडचण वाटत नाही. या सर्व परिस्थितीमुळे अनंत गीते यांचे पारडे जड असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. अजून प्रत्यक्ष जाहीर सभांना प्रारंभ झालेला नाही. प्रचाराच्या रणधुमाळीत वातावरणही बदलत राहणार आहे.त्याचा फायदा दोन्ही उमेदवार कशाप्रकारे घेतात यावरही निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply