मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले. राजपुरी येथील कोळी बांधवांच्या आगरदांडा बंदरात बांधून ठेवलेल्या बोटी वादळात फुटून नुकसान झाले आहे.
वादळात 30 मिनिटांमध्ये शहरातील 50 टक्के घरांचे कौले, पत्रे उडाले. पाऊस उलट्या दिशेने वाहून शहरातील सर्वच घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवर नारळाची झाडे पडली.
राजपुरी येथील कोळी बांधवांनी आपल्या बोटी वादळाआधी आगरदांडा बंदरात बांधून ठेवल्या होत्या.
आगरदांडा बंदर सुरक्षित आहे म्हणून बोटी त्या बंदरात बांधल्या होत्या, मात्र निसर्ग वादळात वार्याचा जोर इतका होता की वार्याने एकमेकांवर आपटून 20 बोटी फुटल्या. कोळी बांधवांनी फुटलेल्या बोटी राजपुरी किनार्यावर ओढत आणल्या. दरम्यान, मुरूड शहरातील मच्छी मार्केटच्या मागे मासळी विक्रीचा लिलाव करण्यासाठी पत्र्याच्या शेडची उभारणी करण्यात आली होती, मात्र वादळात ही शेडही भुईसपाट झाली आहे.