अलिबाग ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला मोठा तडाखा दिला आहे. मोठ्या प्रमाणावर
वित्तहानी झाली. वीजपुरवठा खंडित झाला. लाखो घरांचे नुकसान झाले. संपर्क यंत्रणा कोलमडली होती. त्यामुळे कुणाशीही संपर्क होऊ शकत नव्हता. सर्वच जॅम झाले होते. अशा कठीण परिस्थितीतही हॅम रेडिओ ऑपरेटर यंत्रणा अविरत काम करीत होती. त्यामुळे शासकीय यंत्रणा एकमेकांशी संपर्क साधत होती. शासकीय यंत्रणेला माहिती मिळत होती.
निसर्ग वादळाच्या प्रकोपामुळे जिल्हा व जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील गावांचे होणारे संभाव्य नुकसान तसेच संपर्क यंत्रणा कोलमडून गेल्यास तातडीने उपाययोजना करीत असताना सर्व विभागांत समन्वय राहू शकत नाही. अशा वेळी हॅम रेडिओच्या मदतीने या समस्येवर मात करता येईल, असा विश्वास रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मजा बैनाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सागर पाठक यांनी दाखविला.
जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क यंत्रणेचा कंट्रोल रूम तयार करण्यात आला. महाबळेश्वर येथे एक रिपीटर ठेवण्यात आला. श्रीवर्धन येथे एक पथक होेते. महाबळेश्वर व श्रीवर्धन येथील हॅमची यंत्रणा गाडीत बसून कार्यरत होती. त्यांना पोलिसांच्या बिनतारी यंत्रणेची मदत मिळत होती. 2 जूनपासून यंत्रणा कामाला लागली. प्रत्यक्ष वादळाच्या दिवशी सर्व संपर्क यंत्रणा कोलमडली. मोबाइल सेवा बंद झाली. अशा वेळी हॅमची यंत्रणा अखंडित काम करीत होती. त्यामुळे शासकीय यंत्रणेचा एकमेकांशी संपर्क होत होता. कुठे नुकसान झाले याची माहिती मिळाली. त्यानुसार पथके पाठविण्यात आली. आवश्यक तेथे मदत पोहचू शकली.
2 ते 5 जून या कालावधीत 98 तास हॅम रेडिओ ऑपरेटरने काम केले. त्यांना पोलिसांच्या बिनतारी यंत्रणेची साथ मिळाली. महाबळेश्वर येथे रिपीटर म्हणून नितीन ऐनापुरे, श्रीवर्धन येथे अमोल देशपांडे, तर अलिबाग येथे दिलीप बापट काम करीत होते. भाऊ चौगुले, मंदार गुप्ते, अमित गुरव, अमोल देशपांडे, चंदू चव्हाण, सुनील उंडे यांनी त्यांना सहकार्य केले. पोलिसांच्या बिनतारी यंत्रणेचे पोलीस निरीक्षक आर. बी. पाटील यांची मदत या सर्वांना झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक या सर्वांशी समन्वय साधण्याचे काम करीत होते.
हॅम ही हौशी रेडिओ ऑपरेटर्सची संघटना आहे. निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात धडकणार याची पूर्वकल्पना हवामान विभागाने दिली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आमची मदत मागितली. आम्ही ती दिली. 98 तास आम्ही काम केले, परंतु त्याचा मोबदला मात्र घेतला नाही.
-दिलीप बापट,
हॅम रेडिओ ऑपरेटर