Breaking News

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताह

6 ते 12 डिसेंबरदरम्यान विविध उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 82वा वाढदिवस आहे. दुग्धशर्करा योग म्हणजे त्यांना संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व प्राप्त झाल्यास यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फोफावण्यामध्ये त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या पाचही विभागांच्या वतीने जन्मदिनानिमित्त कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘रयत’चे माजी सचिव गणेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 26) दिली. ते कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेस संबोधित करीत होते. त्यांच्यासह ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रायगड विभागीय चेअरमन आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य जे. एम. म्हात्रे, दिलीप पाटील आदी मान्यवरांनी या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी असून या वर्षी त्यांच्या संस्थेतील जनरल बॉडी सभासदत्वासही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेसाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस प्रत्येक शाखेत विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच रायगड विभागातील संस्थेचे पदाधिकारी, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शाळांचे चेअरमन, स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांची बैठक झाली होती. या बैठकीत 6 ते 12 डिसेंबरपर्यंत रायगड विभागीय स्तरावरील कृतज्ञता सप्ताह आयोजित करण्याचे एकमताने ठरले होते. रायगड विभागीय स्तरावरील कृतज्ञता सप्ताहामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला/पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, महारांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, हाफ मॅरेथॉन आदी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागांतर्गत रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई व पालघर जिल्हा या ठिकाणच्या शाळा समाविष्ट होतात. रायगड विभागाचे पोलादपूर गट, उरण गट, पनवेल गट, मुंबई गट आणि मोखाडा/डोळखांब गट असे वर्गीकरण करण्यात येते. येथील सर्व शाळांतील विद्यार्थी या स्पर्धा उपक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत. पवारसाहेब म्हणजे हिमालयाच्या उंचीचे व्यक्तिमत्त्व. त्यांचे विचार, कार्य, शिक्षण क्षेत्रातील अनन्यसाधारण योगदान, प्रगतीवादी विचारांची कास धरत साधलेले विकासपर्व हे सारे घडणार्‍या पिढ्यांना कळावे या उद्देशाने कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

–  असे आहेत उपक्रम

6 ते 8 डिसेंबर ः क्रीडा स्पर्धा-प. जो. म्हात्रे विद्यालय, नावडे

7 डिसेंबर ः वक्तृत्व स्पर्धा-श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, गव्हाण

7 डिसेंबर ः निबंध स्पर्धा-अनंत पांडुरंग भोईर विद्यालय,

8 डिसेंबर ः विज्ञान प्रदर्शन-लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज कामोठे

9 डिसेंबर ः तज्ज्ञ मार्गदर्शक व्याख्यान-न्यू इंग्लिश स्कूल, कामोठे

9 डिसेंबर ः सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा-न्यू इंग्लिश स्कूल, कामोठे

9 डिसेंबर ः महारांगोळी-माजी आमदार दत्तुशेठ पाटील स्कूल, कामोठे

9 व 10 डिसेंबर ः वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा (महाविद्यालय गट), आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धा-महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल

11 डिसेंबर ः हाफ मॅरेथॉन-वीर वाजेकर कला, विज्ञान व महाविद्यालय, फुंडे, ता. उरण

12 डिसेंबर ः वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, परिसर स्वच्छता-रयत शिक्षण संस्था, रायगड विभागातील विविध शाखा मुख्यालये.

16 डिसेंबर ः विभागीय स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ-विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply