Breaking News

भाजप बहुमत मिळवणार

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास

पनवेल : नितीन देशमुख

लोकसभा निवडणुकीत भाजप देशात 101 टक्के बहुमत मिळवेल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘रामप्रहर’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला. या वेळी त्यांनी राज्यातही महायुती विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा केला. 

आपल्या मॅरेथॉन मुलाखतीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. ते म्हणाले, 2019ची लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय स्तरावरची असल्याने या निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे आणि त्यांनी घेतलेले विविध निर्णय, केंद्राचे आंतरराष्ट्रीय धोरण, तसेच या सगळ्याचा लोकांवर होणारा परिणाम याचा विचार केला जातो. यातून जनतेला झालेला फायदाही लक्षात घेतला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेत निर्माण केलेला आत्मविश्वासदेखील महत्त्वाचा आहे. केंद्र आणि राज्य सरकारने पाच वर्षांत केलेली कामे आणि योजना यावर मोठे पुस्तक लिहिता येईल. आम्ही ही माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत. या निवडणुकीत त्या त्या ठिकाणी दिलेल्या उमेदवारांचा विचार करून राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांची महायुती महत्त्वपूर्ण असल्याचे लोकांना पटवून देत आहोत.

शेकापचे वर्चस्व संपले

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष आता नावालाच अस्तित्वात आहे. पनवेलमध्ये तो 25%ही उरला नसल्याचे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपण खासदार असताना येथे शेकापचे वर्चस्व होते, परंतु आपण पक्ष सोडल्यानंतर या पक्षाची अवस्था काय झाली याचा पाढाच वाचला. त्यांनी पुढे नमूद केले की, प्रशांत ठाकूर 2009मध्ये काँग्रेसचे आमदार झाले. 2014मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्या वेळीच शेकापचा बालेकिल्ला पूर्ण ढासळला. प्रशांत ठाकूर त्यापूर्वी 2006मध्ये पनवेलचे नगराध्यक्ष होते. पनवेल महानगरपालिका झाल्यावर 78 पैकी 51 जागा भाजपने स्वबळावर जिंकल्या. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीला एकतृतीयांश जागाच मिळाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-सेनेला अनेक ठिकाणी चांगले यश मिळाल्याने आता शेकापचे वर्चस्व संपले असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आता शेकाप नेते दुसर्‍या कोणाला तरी उभे करतात. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीला पुढे केले, मात्र हा प्रयोग यशस्वी होणार नाही.

सुज्ञ मतदार महायुतीच्याच पाठीशी

मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचा पाया भक्कम आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच आमदार भाजप आणि शिवसेनेचे आहेत. केवळ एकच आमदार राष्ट्रवादीचा आहे. पिंपरी-चिंचवड आणि पनवेल महापालिका भाजपकडे आहेत. मतदारसंघातील अनेक नगरपालिका आणि ग्रामपंचायती युतीकडे आहेत. या मतदारसंघात कॉस्मोपोलिटन वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. याचा फायदा महायुतीला होईल. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कोण काम करतो हे पाहणारा हा मतदार आहे. आता प्रांतीय भेदभाव विसरून लोक आपल्या खेड्याचे शहरीकरण करायला लागले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात काय बदल झाले, जागतिक पातळीवर आपल्या देशाला मिळालेला मान-सन्मान याची जाणीव होत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रगतशील राष्ट्र बनण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा मतदार महायुतीच्याच पाठीशी आहे, हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले.

भाजपचे काम शिस्तबद्ध

‘पार्टी वुईथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भाजपच्या अनुभवाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, भाजप हा शिस्तीने चालणारा पक्ष आहे. वर्षाचे 12 महिने असे पाच वर्षे काम करताना पक्षाचे बुथ प्रमुख, त्यामध्ये 10 पन्ना प्रमुख आणि सहा बुथचा ग्रुप अशा संघटनात्मक पद्धतीने गावागावात जाऊन लोकांना शासनाच्या योजनांची माहिती कार्यकर्ते देतात व त्या योजना राबविण्याचे काम करतात. अशाप्रकारे थेट शासनच लोकांपर्यंत पोहोचून याचा परिणाम म्हणून राज्यात झालेल्या पालिका ते ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर स्वतः पक्षाच्या सगळ्या बैठकांना जातात, त्या गांभीर्याने घेतात. तेथे वेळेवर न येणार्‍याला समज दिली जाते. बैठक सुरू झाल्यावर दरवाजा बंद केला जातो. यातून कार्यकर्त्यांना शिस्त लागते. त्यामुळे कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने आपले काम करताना दिसतात.

व्यक्तिस्वातंत्र्य हवे, पण स्वैराचार नको

आपल्या देशात अस्वच्छता, गचाळता आणि गोंधळ वाढत आहे. देशात अराजक माजविले जात आहे. त्यावर मोदी सरकारने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेस आणि इतर पक्ष अराजक माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशात व्यक्तिस्वातंत्र्याचे अति स्तोम माजवले जात आहे. व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे, पण त्याचा स्वैराचार होता कामा नये. या देशाची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परदेशी नागरिक आले, त्यांनी जाती-धर्माच्या नावावर काही केले, तर तो त्यांचा अधिकार आहे असे म्हणून चालणार नाही. आपला त्रास दुसर्‍याला होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. नाही तर मग तो स्वैराचार होईल. तसे होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पक्षादेशाप्रमाणे काम करीत असतो.

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना चोख उत्तर

आज विरोधी पक्ष नेहमी प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागतो. याबाबत बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, विरोधी पक्षाला आपल्या मुख्यमंत्र्यांनी सर्जिकल स्ट्राईक होण्यापूर्वी सांगितले असते, तर तुमचा एक नेता त्या विमानाला बांधून पाठवला असता, असे चांगले उत्तर दिल्याचे म्हटले. ते पुढे म्हणाले, काश्मीरमध्ये आंदोलक सैन्यावर दगड मारतात, पण त्यांना सैन्याने काही करायचे नाही यामुळे दहशतवाद्यांचे फोफावले. पंतप्रधान मोदींनी तेथील मुफ्ती सरकारला पाठिंबा देऊन सुधारणा होते का पहिले, पण शेवटी सरकारमधून बाहेर पडून आता आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो असे म्हणून सैन्याला अधिकार दिले. मग आपल्या सैनिकांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना धडा शिकविला.

सोशल मीडियाने सत्य दाखवावे

या निवडणुकीत वापरले जाणारे सोशल मीडिया हे प्रभावी साधन आहे, पण त्याचा वापर कसा करावा हे महत्त्वाचे असते असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. आज राज ठाकरे वेगळे बोलतात. हेच राज ठाकरे पूर्वी आघाडी सरकारला मोदींच्या पायाचे तीर्थ प्यायला सांगत असतानचे त्यांचे व्हिडीओ आपण पाहिलेत. मग ते आज जे सांगत आहेत ते खरे की आधी सांगत होते ते खरे? त्यांचा कोणता व्हिडीओ खरा असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारने योजना राबवली की 24 तास तिथे जाऊन काय चालले आहे हे पाहात बसणे अपेक्षित नाही. त्यामुळे सोशल मीडियाने सुयोग्य तेच दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुकडे जोडून व्हिडीओ बनवून लोकांची दिशाभूल करण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला, तरी आता लोकांना खात्री पटली आहे की देशाला देश म्हणून पुढे नेण्याचे कार्य भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच करू शकते, असेही त्यांनी जोर देत म्हटले.

सिडकोचा कारभार सुधारला

सिडकोचा आधीचा आणि आताचा कारभार याची तुलना करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, नैना प्रकल्प सुरू करताना सिडकोने जास्त लक्ष देणे गरजेचे होते. पुनर्वसन करायच्या जागेचा विकास अगोदर करायला हवा होता. अधिकार्‍यांचा गचाळपणा नडला. त्यांनी सुरुवातीला कामाकडे दुर्लक्ष केले व काम रेटण्याचा प्रयत्न केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सप्टेंबर 2018मध्ये सिडको अध्यक्षपदाची सूत्रे घेतली त्या वेळेपासून कामाला चालना मिळाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थलांतरित होणार्‍यांना जो मोबदला मिळणार आहे तो भारतात सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे सगळीकडे या पद्धतीने मोबदल्याची मागणी केली जाते. जागा सोडणार्‍यांना तीन पट जागा मिळणार आहे. आमच्या घराजवळ मोटरसायकल जात नव्हती तिथे आता मोठी गाडी जाणार आहे. तेथे प्लॅनिंग करून स्मार्ट सिटी बनवली जात आहे. विमानतळाजवळ पुष्पक नगर आणि गव्हाण फाट्याजवळही एक नगर बनवले जात आहे. त्यासाठी साडेबावीस टक्के एफएसआय दिला आहे. त्यामुळे ज्या गावांचे स्थलांतर झाले नाही त्यांचीही आता आम्हालाही येथून हलवा अशी मागणी होत आहे. सुरुवातीच्या काळात दिरंगाई झाली, पण आता 93% लोकांना सुविधा मिळाल्या आहेत. वर्षभरात सगळे काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पाण्याचा प्रश्न सुटणार

पाण्याच्या मुद्द्यावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत पाण्याचा तुटवडा निर्माण झाला याला कारण सिडकोने मोठी चूक करून मोरबे धरण नवी मुंबईला दिले. त्या वेळच्या आघाडी सरकारने केलेली ती चूक आहे. धरण रायगडचे आणि पाणी नवी मुंबईला. त्यांना ठाणे जिल्ह्यातून पाणी द्यायला पाहिजे होते. यामुळे आज आपल्याला पाणी कमी पडते आहे, याकडे लक्ष वेधले. आपल्यासाठी अमृत योजना मंजूर झाली आहे. त्याचे काम पूर्ण होण्यास कालावधी लागणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर पाण्याचा प्रश्न सुटेल. आमदार प्रशांत ठाकूर चार महिन्यांपूर्वी सिडकोचे अध्यक्ष झाल्यावर नवीन पनवेलमधील जलकुंभ धोकादायक झाल्याने ते पाडण्यात आले. नवीन जलकुंभांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचे काम पूर्ण होताच नवीन पनवेलमधील पाण्याचा प्रश्न सुटेल. लोकांना चांगल्या पद्धतीने पाणी मिळाल्याचा आम्हाला आनंद होईल, हेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

लोक पार्थला स्वीकारणार नाहीत

पनवेल महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, कामोठे या वसाहतींमधील पश्चिम महाराष्ट्रातील असलेले रहिवासी आपल्याला मते देतील हा राष्ट्रवादीचा भ्रम आहे.  पश्चिम महाराष्ट्रात अनेक वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या ठिकाणी त्यांना विकासकामे करता आली नाहीत. त्यामुळे तेथील त्यांची सत्ता गेली. ती कोकणी माणसामुळे नाही; तर पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारले आहे. आपल्या रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये लोकांनी राष्ट्रवादीचा आमदार अनेक वर्षे निवडून दिला, मात्र त्या भागाचा विकास झाला नाही. म्हणूनच पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडी पराभूत झाली. मग आता त्यांनी आपल्या घरातील माणूस उभा करून लोकांना विकासाची स्वप्न दाखवण्यात काय अर्थ आहे. पार्थ  सुशिक्षित, पदवीधर म्हणजे बीकॉम आहे याचे भांडवल केले जाते. आज पदवीधर लाखोंच्या संख्येत असल्याचे आपण पाहतो. त्याच्यापेक्षा अनेक चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे होते. ते सुशिक्षित नाहीत काय? त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. पार्थला कसलाही अनुभव नसताना एकदम लोकसभेची उमेदवारी दिली. त्याला प्रथम बारामती किंवा पुणे जिल्ह्यातील एखाद्या विधानसभा मतदारसंघातून आमदार केला असता, तर कामाचा अनुभव मिळाला असता. लोकांना त्याचे कर्तृत्व पाहायला मिळाले असते. त्यानंतर त्याला लोकसभेला उभे करणे योग्य ठरले असते. त्याचे मतदान इथे नसल्याने तो लोकांना परका उमेदवार वाटतोय. त्यामुळे लोक त्याला नक्कीच घरी बारामतीला परत पाठवतील.

पवारांना मदतीचा प्रश्नच उद्भवत नाही

राष्ट्रवादीसोबत असल्याच्या अपप्रचाराबद्दल बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले की, शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. आता तुम्हाला ममता बॅनर्जी आणि मोदी यांचे संबंध कसे आहेत माहीत आहेत. तरीही त्या त्यांना मिठाई पाठवतात, पण आपण मोदींना मत देणार नाही असे सांगतात. मग आम्ही कसे पवारांना मत देणार? राजकारण आणि नातेसंबंध वेगळे असतात. पवार साहेबांनी शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले आहे, पण नंतरची पिढी वेगळी वागते. अजितदादांनी माणसे सांभाळली नाहीत. त्यांचे माझे चांगले संबंध आहेत, पण मला खरंच वाईट वाटते पार्थ पवारांच्या आईला मत मागण्यासाठी खारघरला जा, तळोजाला जा, कामोठ्याला जा असे गावोगावी फिरावे लागते आहे. हा त्रास त्यांना द्यायला नको होता. ही वेळ त्यांच्यावर का आली? त्यांना जर खरोखरच उभे राहायचे होते, तर वर्ष-सहा महिने आधीच या भागात येऊन काम का केले नाही? लोकांनाही आता समजते की फक्त आपल्या घरातील एक खासदार वाढण्यासाठी त्यांना पवार साहेबांनी येथे उभे केले आहे. निवडणुका झाल्या की ते पुन्हा बारामतीला जातील. इकडे परत येणार नाहीत. माझा मुलगा प्रशांत ठाकूर पनवेल मतदारसंघातून सहा महिन्यांनी विधानसभेला उभा राहाणार असल्याने पवारांना मदत करण्याचा मी विचारच करणे शक्य नाही. वेडा माणूसही असा विचार करणार नाही. आम्ही संबंधापोटी त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणार नाही, पण त्यांच्या मुद्द्यांना स्पष्ट व चांगल्या भाषेतच उत्तर देऊ. एरवी बाकी काही अपेक्षा कोणी ठेवू नयेत. 

महायुती अभेद्य, आघाडीत मात्र वाद महापालिका निवडणुकीत भाजप आणि सेना असे आम्ही एकमेकांविरुद्ध लढलो हे खरे आहे, पण लोकसभेसाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र लढण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला. हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी त्यांना लहान भाऊ-मोठा भाऊ असे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा होत्या, पण आमची भांडणे-मारामार्‍या झाल्या नव्हत्या. आम्ही फक्त वेगळे लढलो होतो. त्यामुळे आता एकत्र प्रचार करताना अडचण येत नाही आणि पुढे विधानसभेला त्यांना प्रशांत ठाकूरांचा प्रचार करावयाचा आहे. याउलट काँग्रेस-शेकाप कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षे हाणामार्‍या झाल्या होत्या. त्याच्या न्यायालयात केसेस सुरू आहेत. असे असताना जुना काँग्रेसवाला शेकापच्या मागे जाण्यास तयार नाही. बॅ. अंतुलेंचा मुलगा नाविद अंतुले यांनी म्हणूनच शिवसेनेत प्रवेश करून ना. अनंत गीतेंचा प्रचार केला. त्याप्रमाणे या मतदारसंघातीलही जुने काँग्रेसवाले आघाडीच्या मागे न जाता महायुतीच्या उमेदवाराला मत देतील अशी खात्री आहे. रायगडमधील तीन विधानसभा मतदारसंघांतून आम्ही श्रीरंग बारणे यांना एक लाखापेक्षा जास्त आघाडी देऊ, असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेवटी व्यक्त केला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply