पनवेल ः बातमीदार
पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी तळा येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. घरांचे छप्पर उडल्याने नागरिकांना घरविना राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब व तारा कोसळल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही नागरिकांची एका वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी तळा (इंदापूर, रायगड) येथे एक हजार किलो तांदूळ, 100 किलो चणाडाळ, 100 किलो मसूर डाळ, 200 किलो कांदे-बटाटे, 100 किलो साखर, चहा, 100 किलो मीठ, 100 लिटर तेल, 600 साबण इत्यादी सामानाचे वाटप केले. यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाने पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती. सद्यस्थितीत चक्रीवादळ झालेल्या भागात मदतीचा ओघ सुरू आहे.