पनवेल ः वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फकीर चांद शेख याने आपल्या 15व्या वाढदिवसानिमित्त स्वत:च्या पिगी बँकेत जमा झालेले पाच हजार 900 रुपये पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत जमा करून समाजाप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या उपस्थितीत त्याने हे पैसे जमा केले. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे कोरोना रुग्णांना बिस्कीट पुड्यांचा बॉक्स व पनवेल शहर, तालुका पोलीस स्टेशनला सॅनिटायझर वाटप केले. या वेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी त्याच्या कार्याचे कौतुक करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्याला काय व्हायची इच्छा आहे, असे विचारले. आपले आवडते क्षेत्र किंवा शासकीय सेवेत जाण्याबाबत उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी त्याला मार्गदर्शन करून प्रेरणादायी पुस्तके भेट दिली.