Breaking News

महामानवाचे पुण्यस्मरण

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवनच मानवकल्याणासाठी होते. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या उभारणीसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. किंबहुना, आज आपण लोकशाहीची मधुर फळे चाखत आहोत ती डॉ. बाबासाहेबांच्या अथक आणि अहर्निश परिश्रमांमुळेच, हे विसरता कामा नये. त्यांच्या कार्याचे विस्मरण म्हणजे संपूर्ण भारतीयत्वाचे विस्मरण मानायला हवे.

या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भक्कम लोकशाही व्यवस्था दिली. लोकशाहीला अभिप्रेत असलेली सर्वोत्कृष्ट राज्यघटनाही त्यांनीच दिली. स्वातंत्र्यानंतरही 70 वर्षे आपला देश अखंड, एकसंध आणि सार्वभौम राहिला याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना आणि दूरदृष्टीला आहे. बाबासाहेबांनी उभा करून दिलेला देश पुढील पिढीच्या हाती सोपवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशात विकासाचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले. सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास हा पंतप्रधान मोदींचा मंत्र म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून बाबासाहेबांनीच दाखवलेला मार्ग आहे हे बर्‍याच जणांच्या अजुनही ध्यानी येत नाही. दुसर्‍या महायुद्धानंतर जर्जर झालेला देश भारतीय नेत्यांच्या हाती सोपवून ब्रिटिश राज्यकर्ते मायदेशी निघून गेले. त्यानंतर देशाची अर्थव्यवस्था मुळापासून उभी करण्यासाठी रिकन्स्ट्रक्शन कौन्सिलचे सदस्य या नात्याने डॉ. बाबासाहेबांनी मोलाचे कार्य केले. अनेक सिंचन प्रकल्पांच्या उभारणीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे. हिराकुड धरण प्रकल्प त्यांच्याच अखत्यारीत हाती घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब यांचा सिंहाचा वाटा होता. या महामानवाचे संपूर्ण जीवनच रचनात्मक कार्याने भरलेले आहे. त्यांचे मानवतावादी व सुधारणावादी विचारच सर्वांना पुढे नेतील यात शंका नाही. सुदैवाने डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत देश विकासाच्या महामार्गावर दौडवणारे समर्थ नेतृत्व आता पंतप्रधान मोदी यांच्या रूपाने आपल्याला लाभले आहे. परंतु कधी-कधी प्रश्न असा पडतो की डॉ. बाबासाहेबांनी दिलेली शिकवण एक समाज म्हणून आपण किती लक्षात ठेवली आहे?त्यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज गेल्या 70 वर्षांत खरोखर निर्माण झाला आहे का? जातपात, धर्मभेद, रूढीपरंपरा यांसारख्या विघातक गोष्टी कायमच्या गाडून टाकण्यात आपल्याला यश आले आहे का? संकटाच्या काळात भारतीय समाज असामान्य पातळीवरील एकजूट दाखवतो हा आजवरचा अनुभव आहे. एरव्ही देश, भाषा, प्रांत, धर्म आदींनी वाटला गेलेला अठरापगड भारतीय समाज वेळ आली की हातात हात घालून छातीचा कोट करून आव्हानाला तोंड देतो हा पूर्वानुभव या घडीला अत्यंत महत्त्वाचा गुरुमंत्र आहे. कोरोनासारख्या महासंकटाशी आपण सारेच लढत आहोत. गेले वर्षभर या संकटाशी झुंजताना आपली शक्ती कमी पडू लागली आहे काय असे वातावरण आहे. डॉ. बाबासाहेब यांच्या मनातील भारताची पुनर्उभारणी करावयाची असेल तर या संकट काळात आपण सार्‍यांनी एकत्र आले पाहिजे. या महामानवाची जयंती आपण आपापल्या घरीच राहून साजरी करायला हवी. समाज म्हणून आपण इतके करू शकलो तर कोरोनाचे संकट, हा-हा म्हणता टळेल आणि विकासाच्या वाटेवर भारताची पावले वेगाने पुढे पडू लागतील यात शंका नाही. किंबहुना, एक जबाबदार समाज म्हणून आपले ते कर्तव्यच आहे. तेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे पुण्यस्मरण ठरेल.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply