कोरोनामुळे 2020मध्ये सारेजण त्रस्त असताना कलाक्षेत्रातून काही दु:खद घटना समोर आल्या. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि त्यानंतर अष्टपैलू अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. हे दोन गुणी अभिनेते नैसर्गिकपणे काळाच्या पडद्याआड गेले, तर पाठोपाठ संगीतकार वाजिद खान यांचा कोरोनाने बळी घेतला. आता युवा नायक सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून सर्वांनाच धक्का दिला आहे.
बॉलीवूड या चार अक्षरी शब्दाची अनेकांना भुरळ पडते. आपल्या देशात फिल्मी दुनियेचा फार मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक जण या क्षेत्रात आपले नशीब आजमावतात. असंख्य तरुण-तरुणींना चंदेरी झगमगाट खुणावत असतो, पण सर्वांनाच इथे संधी मिळत नाही, तर दुसरीकडे काहींनी पार्श्वभूमी नसताना चांगले बस्तान बसविल्याचीही उदाहरणे आहेत. यापैकीच एक सुशांत सिंह राजपूत. हा तरुण स्ट्रगल करीत यशाच्या शिखरावर पोहचला होता. सुशांत मूळचा बिहारचा, पण दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला. ऑल इंडिया एन्ट्रन्स परीक्षा सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सुशांतने केमिकल इंजिनिअरींगला प्रवेशही घेतला, मात्र त्यात आपले मन रमत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे करिअर करायचे ठरविले. सुरुवातीच्या काळात त्याने छोट्या-छोट्या मालिकांमध्ये काम करणे सुरू केले. एका नाटकाच्या वेळी दिग्दर्शिका एकता कपूर त्या ठिकाणी उपस्थित होती. तिने सुशांतमधील टॅलेंट हेरले आणि त्याचे नशीबच बदलले. त्यानंतर पवित्र रिश्ता या सीरियलमधून सुशांतला खास ओळख मिळाली. ‘पवित्र रिश्ता’ गाजल्यावर त्याला बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळाला. ‘काई पो चे’ या चित्रपटाद्वारे त्याचे बॉलीवूडमध्ये पदार्पण झाले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर अनेक चित्रपटांत त्याने काम केले. भारताचा क्रिकेटपटू व माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावरील बायोपिक ’एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने त्याला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. काही महिन्यांपूर्वी आलेले त्याचे ’केदारनाथ’ आणि ’छिछोरे’ सिनेमेही यशस्वी ठरले होते. विशेष म्हणजे छिछोरे या चित्रपटातून त्याने आत्महत्या करू नका, असा संदेश तरुणाईला दिला होता. त्याच सुशांतने स्वत:ची जीवनयात्रा संपविली तीही अवघ्या 34व्या वर्षी. आता तर त्याचा उभरता काळ सुरू झाला होता. आणखी बरीच मजल त्याला मारायची होती. मान-सन्मान स्वीकारायचे होते, मात्र नियतीला ते मान्य नव्हते. म्हणूनच हा गुणी अभिनेता सर्वांना सोडून निघून गेला आहे. त्याच्या आत्महत्येबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची मॅनेजर दिशा हिने आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो तणावात होता, असेही म्हटले जात आहे. लोकहो, चित्रपटसृष्टी वरकरणी विविधरंगी दिसते. नायक-नायिकांचे जीणे म्हणजे स्वर्गात वावरण्यासारखे असते, अशी सर्वसामान्यांची धारणा असते, मात्र अशी एखादी घटना समोर येते आणि त्या धारणेला तडा जातो. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यातून सत्य काय ते समोर येऊ शकेल, पण सुशांतने एवढे टोकाचे पाऊल उचलणे गरजेचे होते का, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परिस्थिती विपरीत होऊनदेखील अनेक जण लढत आहेत. स्वत:सह कुटुंबासाठी झगडत आहेत. मग कमी वयात सर्वकाही मिळूनही सुशांतने का हार मानली असावी, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.