Breaking News

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची नृत्य शैली ठरवताना, अगदी ते सेन्सॉर संमत होत असताना ते गाणे नेमके कसे आहे याची कल्पना असतेच, तरीदेखील अलील गाण्याचा जन्म होतोच कसा? गीतकार डोळे मिटून तर गाणं लिहित नाही, गायक न वाचताच गात नाहीत, संगीतकार उगाच चाल लावत नाही, कलाकार गाणं न ऐकताच कॅमेरासमोर नाचत नाहीत. तरी तोल सुटतोच कसा? बरं तो किती सुटावा याचं
काही ताळतंत्र?
ताजं उदाहरण, ‌’के डी द डेव्हिल‌’ या चित्रपटातील सरके चुनर या वादग्रस्त गाण्याचे! रकीब आलम यांनी लिहिलेल्या या गीताला अर्जुन जन्या याचं संगीत आहे आणि हे गीत मंगली हिने गायले आहे आणि संजय दत्त आणि नोरा फतेही यांनी त्यावर वाह्यात अंगविक्षेप करणारे नृत्य केले आहे. आता ते म्हणतील, आम्ही नृत्य दिग्दर्शकाला फॉलो केले, पण मुळात गाणं लिहिताना गीतकाराचा हेतूच जर किळसवाणा असेल तर? यू ट्यूबवर असे काहीही पाहिले नि ऐकलं जाते या भ्रामक कल्पनेतून हे सगळे घडलं बिघडलं आणि त्यावर सोशल मीडियावर अशी काही सडकून टीका झाली की हे गाणे हटवल्याशिवाय काही पर्यायच नव्हता. आता म्हणे, मूळ कन्नड चित्रपटातील गाण्याचे हे भाषांतर केले आहे. मूळ गाणेही असं अचकट विचकट, अलील बिभत्स असेल तर तेही आक्षेपार्ह, निंदनीय आहे आणि मूळ गाणं हिंदीत आणताना आपण काय करतोय हे गीतकार, संगीतकार, गायक, नृत्य दिग्दर्शक, कलाकार यांना त्याहूनही समजत नसेल तर त्यांच्याकडे सामाजिक सांस्कृतिक माध्यम यांचे भान नाही. एक प्रकारची बेपर्वा वृत्ती त्यांच्यात आहे हे यातून अधोरेखित होत आहे.
अशा अलील चाळे करणाऱ्या कलाकारांना भरभक्कम मानधन महत्त्वाचे वाटते की काय? भरभक्कम मानधन मिळते म्हणून आपलं चित्रीकरण लवकर संपवून उंची सलून आणि ब्युटी पार्लर असो, फूड पॉईट असो यांच्या रिबिनी कापण्यात आज बरेचसे सेलिब्रिटीज (सर्व नाहीत) रस घेतात याच कर्तव्याची सोशल मीडियात पोस्ट शेअर करण्याचं वेगळे मानधन घेतात अशा व्यावहारिक वातावरणात आपण नृत्य करीत असलेले गाणे वाह्यात आहे याचं कदाचित भान सुटत असेलही. पैसे मिळताहेत म्हणून आपण कसेही नाचलो तरी चालेल असा त्यांचा भ्रम असावा. सोशल मीडियाच्या युगात तसा भ्रम अनेकांचा झाला आहे.
अशा गीत संगीताचीही चक्क एक फिल्मी परंपरा आहे. नव्वदच्या दशकात अशाच गाण्यांवरुन बरेच वादंग निर्माण झाले. सुभाष घई निर्मित व दिग्दर्शित खलनायक(1993)च्या गाण्याची ध्वनिमुद्रिका, ध्वनीफित प्रकाशित झाली आणि चोली के पीछे क्या है गाण्याचे वादळ निर्माण झाले. आनंद बक्षी लिखित या गाण्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. इला अरुणने ठसकेबाजपणे गायलंय. गाण्याचा मुखडा वाह्यात आहे असे टीकाकारांचे म्हणणं होतं. त्या काळात अगोदर ऑडिओ कॅसेट आपल्यापर्यंत येत असे आणि त्यामुळे पडद्यावर हे गाणे कसे दाखवले आहे याची कल्पना येत नसे. आपल्या देशात उपग्रह वाहिन्यांची ती सुरुवात होती. सुभाष घईच्या वतीने सांगण्यात येत असे की, हे उत्तर भारतातील लोकगीत संगीत नृत्य आहे. ते या चित्रपटात प्रासंगिक आहे. तेथील संस्कृतीनुसार त्यात वाह्यात असे काही नाही. चित्रपटात ते वापरले गेल्याने ते वाह्यात वाटते. प्रसारमाध्यमातून यावर बरेच काही लिहिले गेले. चित्रपट संगीत क्षेत्रातील अनेकांनी आपापली मते व्यक्त केली. या उलटसुलट गदारोळात या चित्रपटाच्या ध्वनीफितीची अक्षरशः प्रचंड विक्री वाढली. सिल्व्हर डिस्क झाली, गोल्डन डिस्कही झाली, प्लॅटीनम डिस्क झाली…. आणि असे करत करत ‌’खलनायक‌’ प्रदर्शित झाला आणि पडद्यावर चोली के पीछे क्या है दिसले. नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी माधुरी दीक्षितला दिलेल्या स्टेप्स कुठेही वाह्यात नव्हत्या. अन्यथा सेन्सॉरची कैची होतीच. याच गाण्यात संजय दत्तही आहे आणि त्याच्या मनोरंजनासाठी हे गीत संगीत नृत्याची बहारदार फोडणी आहे. अर्थात, ही सगळी पटकथेची मागणी. याच बहुचर्चित चित्रपटासह सावनकुमार निर्मित आणि दिग्दर्शित ‌‘खलनायिका‌’ही आला. त्यात याच गाण्याशी स्पर्धा करणारे चोली मे है तबाही तबाही हे होळी गीत. वर्षा उसगावकरने जितेंद्रसोबत या गाण्यात छान रंग भरला.
याच काळात आणखी काही गाणी वादग्रस्त ठरली. आँखें चित्रपटातील सरकायलो खटीया जाडा लागे (गोविंदा आणि शिल्पा शिरोडकर) हे ग्रामीण संस्कृतीतील गाणेही फार फार गाजलं. पार्थो घोष दिग्दर्शित ‌’दलाल‌’ या चित्रपटातील चढ गया उपर रे हे गाणे देखील लोकगीत संगीत नृत्यावर आधारित असल्याचे म्हटले गेले. दुलारा या चित्रपटातील गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यावरील तेरी पॅन्ट भी सेक्सी गाण्यावरही बरीच उलटसुलट टीका झाली. गाण्यात सेक्सी हा शब्द आला तर त्यात इतकं बिघडलं काय असंही म्हणणारा एक वर्ग होताच. नव्वदच्या दशकात आपल्या देशात जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था आली, त्यात नवीन पिढीला नवीन जगाची ओळख होतेय त्यात सेक्सी हा शब्द स्तुती म्हणून वापरला जातो असे म्हटले गेले. म्हणून तर ‌’खुद्दार‌’ या चित्रपटातील करिश्मा कपूरवरचे हाय सेक्सी हॅलो सेक्सी लोग बोले हे गाणे लोकप्रिय ठरले. हिंदी चित्रपट संगीताचा हा उतरता काळ मानला जातो.
केदार शिंदे दिग्दर्शित ‌’जत्रा‌’ या चित्रपटातील कोंबडी पळाली या आजही लोकप्रिय असलेल्या गाण्याला संगीतकार अजय अतुल यांनी ‌’अग्निपथ‌’ या चित्रपटात चिकनी चमेली असे करत हिंदी चित्रपटात नेले. त्यावरचे कैतरिना कैफचे नृत्य वाह्यातच आहे. तिचा एकूणच अंगविक्षेप बिभत्स आहे. तरीही सेन्सॉरने त्यावर कैची का चालवू नये? कैतरिना कैफ फक्त आणि फक्त एक ग्लॅमरस डॉल आहे. नृत्यासाठी ती ओळखली जात नाही. तरीही तिला या नृत्यासाठी निवडले आणि एकदम भडक असे नृत्य पडद्यावर आले… आपण नृत्य करताना आपल्या शरीराला कसे विचित्र पद्धतीने नाचवतोय हे खुद्द कैतरिना कैफला समजू नये? की सुपर डुपर हिट गाण्याची संधी मिळाली आहे या आनंदात ती
हे विसरली?
आपण नृत्य करताना गाण्याचे बोल ऐकायला हवेत ही पहिली सावधानता आणि नृत्य दिग्दर्शकाने दिलेली स्टेप ही पुढची महत्त्वाची पायरी. ते होत नाही म्हणून तर सरके चुनर यासारखे प्रकार होतात. आणि त्याला आवरा, त्यावर वेळीच बंदी घालण्यात यावी अशी मागणी होते. चित्रपटाला सेन्सॉर नको असे म्हणणारा एक वर्ग चित्रपटसृष्टीत आहे, ते सेन्सॉर नसेल तर गीत संगीत नृत्यात काय काय दाखवतील याचा काहीच नसेल हे नक्कीच, कारण मनोरंजन क्षेत्रात काहीना सवंग प्रसिद्धी हवी असेल तर? तोच तर मोठाच प्रश्न आहे. अधूनमधून अशी वाह्यात, बिभत्स गीत संगीत नृत्याची निर्मिती होते आणि वाद निर्माण होतोय… संस्कृतीरक्षक आहेत म्हणून या सगळ्याला चाप लागतोय.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ -मुख्यमंत्री फडणवीस

रायगड : प्रतिनिधीमहाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र …

Leave a Reply