पनवेल ः प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) लोह व स्टील मार्केट समितीवर पनवेल महापालिकेचे कळंबोली येथील नगरसेवक बबन मुकादम यांच्या निवडीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. या वेळी नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि. 18) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. महापालिका क्षेत्रात सन 2021-24करिता सार्वजनिक शौचालये, मुतार्या, स्वच्छतागृहांची अत्याधुनिक तंत्राचा वापर करून यांत्रिक पद्धतीने निर्जंतुकीकरण व दुर्गंधनाशक रसायनांची दैनंदिन फवारणी करून प्रतिदिन दोन वेळा साफसफाई करणे या विषयावर चर्चा करून महासभेने मंजुरी दिली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही साफसफाई दिवसातून दोनदा करण्यात येत आहे. या विषयांतर्गत महापालिका क्षेत्रातील अंदाजित दोन हजार सीटची साफसफाई करण्यात येणार आहे. अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखले देताना आकारण्यात येणारे फायर प्रीमियम चार्जेस व फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेसचे सुधारित दर आकारण्याच्या विषयासही महासभेने मंजुरी दिली. महापालिकेमार्फत अग्निशमनविषयक इमारतींना परवानगी देताना आकारण्यात येणारे शुल्क हे अत्यल्प असल्याने भविष्यातील पायाभूत सुविधा व लागणारे मनुष्यबळ लक्षात घेता आकारणी शुल्क वाढविणे आवश्यक होते. त्यानुसार या ठरावास महासभेने मंजुरी दिली.