Breaking News

चार कोटींचा रक्तचंदन साठा जप्त

जेएनपीटी बंदरातून दोन संशयित अटकेत

उरण : प्रतिनिधी
जेएनपीटी बंदरातून चोरट्या मार्गाने शारजात निर्यात करण्यासाठी पाठविला जाणारा 13 मेट्रिक टन रक्तचंदनाचा साठा न्हावाशेवा डीआरआय विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून जप्त केला आहे. एका कंटेनर कार्गोमधून कांद्याच्या नावाखाली ही तस्करी केली जात होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रक्तचंदनाची किंमत चार कोटींच्या घरात आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
जेएनपीटी बंदरातून एका कंटेनर कार्गोमधून यूएईतील शारजा येथे 29 मेट्रिक टन कांदा पाठविण्यात येणार होता. तशी कागदपत्रेही तयार करण्यात आली होती, मात्र कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने दुर्मीळ रक्तचंदनाची तस्करी करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती न्हावाशेवा येथील डीआरआय विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. खबर्‍याकडून बित्तंबातमी मिळाल्यानंतर डीआरआय विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून संशयित कंटेनर कार्गोची कसून तपासणी केली असता 29 मेट्रिक टनाऐवजी फक्त 17 टन कांदा आढळून आला, तर कंटेनरमध्येच बेमालूमपणे कापडात गुंडाळून लपवून ठेवलेला 13 मेट्रिक टन रक्तचंदनाचा
साठा आढळला.
या प्रकरणी डीआरआय अधिकार्‍यांनी रक्तचंदनाची तस्करी करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन संशयित माफियांना अटक केली आहे. दोन्ही संशयितांना तपासणीसाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply