Breaking News

करंजा गाव कोरोनामुक्तीच्या वाटेवर

133 जण ठणठणीत बरे होऊन घरी

उरण : रामप्रहर वृत्त

उरणमध्ये संचारबंदीच्या 19व्या दिवशी पहिला कोरोना विषाणूने बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर मे महिन्यात करंजा येथील एक तरुण बाधित असल्याचे उघड झाले. मात्र, त्याच्या घरात झालेल्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला आणि सांत्वनासाठी गेलेल्या जवळपास 134 जणांना बाधा झाल्याचे उघड झाले होते. यापैकी 133 जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर एका रुग्णावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे करंजा परिसर कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे.

करंजा हे कोळी आणि आगरी समाजाचे प्राबल्य असलेले गाव आहे. एकूण दहा हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या या परिसरात सुरुवातीला एकास लागण झाली. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 27, 20, 43 अशा प्रकारे 134 जणांना लागण झाली होती. त्यामुळे करंजा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रशासन आणि येथील रहिवाशांमध्ये या काळात वाद झडले.

दाटीवाटीच्या घरांत राहणार्‍या आणि कुटुंबे मोठी असल्याने रुग्णसंख्या वाढली होती. यात ज्येष्ठ नागरिकांसह आठ महिन्यांच्या बालकांनाही लागण झाली होती. या सर्वावर पनवेल आणि कामोठे येथील रुग्णालयांत यशस्वी उपचार करण्यात आले. तर रुग्णसंख्या वाढू नये याकरिता प्रशासनाने पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व सहकार्‍यांनी प्रयत्न केले. त्यासाठी येथील ग्रामस्थ, पोलीस, शिक्षक यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासनानेही मदत केल्यानेच हे शक्य झाल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply