पनवेल : बातमीदार
कोरोनाकाळात कारागृह व्यवस्थापनाला कैद्यांना पर्यायी जागेत हलविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तुरुंगात सामाजिक अंतर पाळत क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची व्यवस्था करण्याच्या प्रश्नावर तोडगा म्हणून कारागृह विभाग आणि रायगड जिल्हाधिकार्यांनी 291 कैद्यांना सध्या खारघरमधील गोखले विद्यालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालयात तात्पुरता तुरुंग उभारण्यात आला आहे.
सध्या खारघर वसाहतीच्या मध्यवर्ती असणार्या गोखले विद्यालयात 291 कैदी आहेत. तळोजा कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता 2126 आहे. कारागृहात संसर्गाच्या भीतीने क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची व्यवस्था करण्याविषयी विचार सुरू होता. मात्र त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न कारागृह व्यवस्थापनाला सतावत होता. यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि कारागृह अधीक्षक कौस्तुभ कुरलेकर यांच्यात चर्चा होऊन खारघर वसाहतीतील गोखले विद्यालय निवडण्यात आले. या तात्पुरत्या कारागृहाची सुरक्षा सध्या 22 कर्मचारी व तीन अधिकार्यांवर आहे.
‘जीवन नव्याने कळेल’
शाळा सुरू झाल्यानंतर कैद्यांना कारागृहात पाठविण्यात येईल. मात्र रोज सकाळी शाळेच्या प्रत्येक वर्गात असणारा सुविचार, वर्गातील बाके, फळा, शाळेचे मोकळे मैदान, शाळेच्या खिडक्यांमधून दिसणारी लोकवस्ती यामुळे कैदी जीवनाकडे सकारात्मक जाणिवेने पाहायला लागतील, अशी अपेक्षा येथील कारागृह अधिकारी व्यक्त करीत आहेत.
विद्यालयात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहात 291 कैद्यांच्या जेवणाची, न्याहारी आणि इतर सोय करण्यात आली आहे. इथे त्यांना वेगळे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
-कौस्तुभ कुरलेकर, अधीक्षक तळोजा मध्यवर्ती कारागृह