Breaking News

‘ड्रॅगन’विरोधात सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लडाख सीमेवर चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 19) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आदी मंत्र्यांसह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करीत सैनिकांना नि:शस्त्र का पाठवण्यात आले, असा आरोप केला होता. त्यावर शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठकीत भाष्य केले. देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झाले आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधानता बाळगली पाहिजे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सगळे एक आहोत, हीच भावना आहे. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत, आमच्या सैन्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. आपल्या सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद आहे.
दरम्यान, भारत-चीन सीमेवर तणावग्रस्त वातावरण आहे. याचदरम्यान दोन्ही देशांत झालेल्या झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले, तर चीनने भारताचे काही सैनिक ताब्यात घेतल्याचे वृत्त होते, मात्र भारतीय सैन्याने या बातमीचे खंडन केले. चीननेदेखील तसे स्पष्ट केले आहे. यासह विविध मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठकीत उहापोह होऊन ‘चिनी ड्रॅगन’विरोधात सर्व बाजूंनी लढा देण्याचे ठरले.

देशाच्या सीमेमध्ये कोणतीही घुसखोरी झालेली नाही. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना आपल्या सैनिकांनी धडा शिकवला.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply