रोहे : प्रतिनिधी
रोहा तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील बिल्डिंगवरील शेड, खासगी शालेय संस्थांचे पत्रे, कौले, पोल्ट्री फार्म यासह सरकारी इमारती व जिल्हा परिषद शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी बांधवांची घरकुले पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या सार्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व अन्य विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत घरांचे चार हजारांच्या आसपास, तर कृषी विभागाचे 1400 हेक्टरपर्यंत पंचनामे करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्तांना मदत म्हणून शासनाकडून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
रोहा तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शासनाकडून 22 जूनपर्यंत तीन कोटी 30 लाख रुपये नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. ज्यांचे पंचनामे करण्यात आले नाहीत, खाते क्रमांक चुकीचा दिला असेल अथवा अन्य समस्या असतील तर त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रोहा तालुक्यात निसर्ग चक्रवादळात घरांप्रमाणेच बागायतदार शेतकर्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजू, नारळ, केळी, पपई, सुपारीसह अन्य फळझाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे.आतापर्यंत कृषी विभागाचे 1400 हेक्टरपर्यंत पंचनामे झाले आहेत. उर्वरित पंचनामे कृषी विभागाकडून
सुरू आहेत.