खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील वासरांग रस्त्यावर खोपोली नगर पालिकेची नवीन वस्तू उभारण्यात आली आहे. त्या वास्तूस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सोमवारी (दि. 30) भाजपाचे परिवहन सभापती तुकाराम साबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली.
छत्रपती शिवाजी महाराज समस्त महाराष्ट्राचे दैवत असल्याने त्यांच्या कालावधीत खर्या अर्थाने रयतेचे राज्य होते. उत्तम प्रशासक, शूर लढवय्ये व प्रजेबद्दल आस्था असणार्या लोककल्याणकारी राजाचे नाव नवीन वास्तूस देणे उचित ठरेल व त्यांचा सन्मान होईल असे तुकाराम साबळे व हेमंत नांदे यांनी
या वेळी बोलताना सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदन पालिका कार्यालयात कार्यालय अधिक्षक गणेश साळवे यांनी स्वीकारले. या शिष्टमंडळात भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस हेमंत नांदे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अजय इंगुळकर, गोपाळ बावसकर व कार्यकर्ते उपस्थित होते.