पनवेल : वार्ताहर
एका महिलेस वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणार्या चौकडीविरुद्ध खारघर पोलिसांनी कारवाई केल्याने अशा प्रकारे अनैतिक धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. पीडित महिला (29) ही ऑगस्ट 2020पासून 27 जानेवारी 2021 रोजीपर्यंत गोमती ब्लीस स्पा व सलून (शॉप क्र. 21, भूमी हाईट्स बिल्डींग, सेक्टर -8, खारघर) येथे मसाजचे काम करीत होती. यातील आरोपी स्मिता शेख-शिवदास व सरबजितसिंग उर्फ बिल्ला हे दोघे वर नमूद ठिकाणी स्पा व सलून चालवतात. या दोन्ही आरोपींनी वरील नमूद कालावधीमध्ये यातील पीडित महिलेस वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले व त्याद्वारे आर्थिक उत्पन्न मिळवले. तसेच अटक आरोपी प्रथमेश कानसकर (स्मिता शिवदास हिचा मुलगा) याने 10 जानेवारी 2021 रोजी व आरोपी सरबजितसिंग उर्फ बिल्ला याने 22 जानेवारी 2021 रोजी फिर्यादीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत फिर्यादी यांनी आरोपी व स्पामालक स्मिता शिवदास हिच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनदेखील या आरोपीने दुर्लक्ष केले. त्रासाला कंटाळून फिर्यादीने 27 जानेवारी 2021 रोजी काम सोडून दिले, परंतु फिर्यादीने काम सोडल्यानंतरदेखील आरोपींनी फिर्यादीला काम करण्यासाठी यावे म्हणून फोनवरून दमदाटी केली. तसेच फिर्यादीच्या पतीला फिर्यादी हा धंदा करतात अशी खोटी माहिती दिली. फिर्यादीचे पती याबाबत विचारणा करण्यासाठी स्पाजवळ आले असता 11 फेब्रुवारी 2021 रोजी फिर्यादी व त्यांच्या पत्नीस आरोपी स्मिता शिवदास, सरबजितसिंग उर्फ बिल्ला, राम चौहान व शाम चौहान यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच राम चौहान व शाम चौहान यांनी फिर्यादीचा विनयभंग केला, अशी तक्रार प्राप्त झाल्यावरून खारघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 62/2021 भादंवि कलम 376, 354, 323, 506, 504, 34सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलम 3, 4, 5प्रमाणे दाखल करण्यात आला. गुन्ह्यात चार पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त शिवराज पाटील झोन 2 पनवेल व सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व सहा. पोलीस निरीक्षक हरीष कळसेकर करीत आहेत. दरम्यान, सलून भाड्याने देताना दुकानमालकांनी खात्री करूनच दुकान भाड्याने द्यावे, असे आवाहन खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी केले आहे.