Breaking News

पनवेल मनपातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन द्यावे

नगरसेवक अनिल भगत यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेतील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात भगत यांनी निवेदनही दिले आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील, संतोष भोईर, मुकीद काझी, नगरसेविका रुचिता लोंढे आदी उपस्थित होते.
नगरसेवक भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महापालिकेकडे 29 गावांचे समावेशन झाल्यापासून आजपर्यंत 320 ग्रामपंचायत कर्मचारी पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे 98 कर्मचार्‍यांची सद्याची परिस्थिती पाहता त्यांना तुटपुंज्या असलेल्या वेतनावर आपले कुटुंब चालवावे लागते. सध्या देशभर सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये याकरिता केंद्र व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेतील ग्रामपंचायत कर्मचारी हे गेल्या तीन वर्षांपासून आपल्या कार्यालयीन सेवेत व्यवस्थितरीत्या काम करीत असल्याचे दिसून येत आहे. हे ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या सेवेमध्ये कायमस्वरुपी कर्मचार्‍यांप्रमाणे आदेशाचे व्यवस्थितरीत्या पालन करून काम करीत असताना असे निदर्शनास आले की, या कर्मचार्‍यांना नियमाप्रमाणे किमान वेतन दिले जात नाही. सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन देण बंधनकारक आहे. त्यांना किमान वेतन व सर्व प्रकारच्या शासकीय सवलती अदा केल्यास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे या विषयाचे गांभिर्य लक्षात घेता पनवेल महानगरपालिका अंतर्गत काम करणारे 98 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन व सर्व प्रकारच्या शासकीय सवलती तातडीने अदा करण्यात याव्यात, असेही भगत यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.
या वेळी झालेल्या चर्चेस आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्या अनुषंगाने या कर्मचार्‍यांना योग्य वेतन मिळण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply