Breaking News

दलित साहित्यिक : बाबुराव बागुल

माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. ’वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास’ अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठे नाव. आज त्यांची पुण्यतिथी. बाबुराव बागूल हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवणाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोहीभाषाशैली, जीवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. बाबुराव बागुल 17 जुलै, 1930 रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात जन्मले. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कॅॅम्पात राहणार्‍या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो. 1957 मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ‘नवयुग’ व ‘युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणार्‍या त्यांच्या कथा 1963 साली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर 1969 सालात ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. ’अघोरी’, ’कोंडी’, ’पावशा’, ’सरदार’, ’भूमिहीन’, ’मूकनायक’, ’अपूर्वा’ अशा कथा-कादंबर्‍यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. 26 मार्च 2008 रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.

बाबूराव बागुलांच्या लेखनाने मराठी साहित्यात कधीच व्यक्त न झालेला विषय मांडला. त्यामुळे त्यांची कथा वेगळी वाटते. बाबुरावांची कथा प्रथमच झोपडपट्टीतील अनुभव ताकदीने उभे करते. तिथले दारिद्र, तिथल्या पिसाट वासना, तिथले संवेदहीन जगणे, तिथले वातावरण, जीवनाच्या दाहक बाजू, शोषितांचे लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये. ’जेव्हा मी जात चोरली होती’ आणि ’मरण स्वस्त होत आहे’ या दोनही कथासंग्रहातून वाचकाला एका नव्या जगाची ओळख होते म्हणुन तेव्हा त्या काळात हे कथासंग्रह चर्चेचे ठरले नसतील तर नवल वाटण्याचे कारण नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर

त्यांच्या लेखनाने पांढरपेशी वाचकांना धक्काच दिला. त्याच बरोबर टीकाकारांनी त्यांचे लेखन अवास्तव, एकांगी, अस्ताव्यस्त लेखन, कृत्रिम संवाद अशी टिकाही केलीच आहे. तरीही दलित कथेंचे शिल्पकार, अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, आणि बाबूराव बागुल यांचे नामोल्लेख टाळुन दलित साहित्याचे मोठेपण सिद्ध करता येणार नाही. मात्र एवढ्या मोठ्या लेखकाला आयुष्याच्या शेवटी स्वत:च्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही. स्वत:कडची असलेली, विकत घेतलेली, पुस्तके विकून उपचार करून घ्यावा लागला. यापेक्षा मोठे दुर्दैव काय? असो….! मराठी साहित्यातल्या एका प्रतिभावंताला एका साहित्य वाचकाची भावपूर्ण श्रद्धांजली!

सन्मान व पुरस्कार

* धारावी (मुंबई), येथे 7 फेब्रुवारी 1999 रोजी भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. उद्घाटनाचे भाषण डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले होते.

* बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ’जनस्थान पुरस्कार’ 2007 साली त्यांना देण्यात आला.

* महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार

* जनस्थान पुरस्कार

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply