Breaking News

रायगडातील बागायतदार हवालदिल

चक्रीवादळग्रस्त अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित

अलिबाग : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील फळबागांना बसला असून, 22 हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. यात आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, मात्र पिकती झाडे उन्मळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गंभीर म्हणजे या बागायतदारांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. हे नुकसान कसे भरून काढायचे या विवंचनेत बागायतदार आहेत.
कोकणात बागायतींना वादळी पाऊस काही नवीन नाही. इथे दरवर्षी हजारो मिलीमिटर पाऊस पडत असतो. वारेही वाहतात. किरकोळ नुकसानही होत असते, मात्र निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील फळबागा अक्षरशः उद्ध्वस्त केल्या. वर्षानुवर्षे जोपासलेली नारळ, सुपारी, आंबा, काजूची झाडे उन्मळून पडली आहेत. श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग या तालुक्यांतील बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातून सावरायचे कसे अशी बागातदार चिंता आहे.  
सुपारीचे एक झाड पिकते होण्यासाठी पाच ते सहा वर्षांचा, तर नारळाच्या झाडाला 10 वर्षे लागतात. त्यानंतर ते झाड उत्पादन देण्यास सुरुवात करते. पिकती झाडे नष्ट झाल्याने हे नुकसान भरून निघण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.  
राज्य शासनाची मदत अद्याप पोहोचलेली नाही. तरीदेखील बागायतदारांनी स्वखर्चाने पडलेली झाडे उचलली आहेत. बागा स्वच्छ केल्या, परंतु त्याची विल्हेवाट कशी लावायची ही समस्या त्यांच्यासमोर आहे.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, एखादा दुसरा व्यवसाय आहे ते यातून सावरतील, परंतु जे पूर्णपणे फळबागेवरच अवलंबून आहेत त्यांची अवस्था बिकट आहे. त्यांना तातडीने मदत मिळण्याची गरज आहे. शासनाची मदत त्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचलेली नाही.
राज्य शासन आर्थिक मदत करणार आहे. शासनाने नुकसानभरपाईचे निकषही बदलले आहेत. आता हेक्टरी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत, मात्र ते पुरेसे नाहीत. असे असले तरी ही मदत वेळेत मिळाली पाहिजे, अशी बागायतदारांची मागणी आहे.

आधीच रोगामुळे सुपारीचे नुकसान झाले होते. आता वादळामुळे झाडे पडलीत. त्यामुळे सर्व बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने बागायतदारांना रोपे व कलमे तसेच बिनव्याजी कर्ज द्यावे.
-हेमंत दांडेकर, बागायतदार

सुपारीचे झाड किमान पाच वर्षांनी, तर माड 10 वर्षांनी उत्पन्न देतो. इतकी वर्षे आम्ही मागे गेलो आहोत. नवीन रोपे तयार नाहीत. त्यामुळे शासनाने आम्हाला रोपे पुरवावीत.
-अ‍ॅड. संजय आचार्य , बागायतदार

सध्या आपल्याकडे पुरेशी रोपे नाहीत. ती तयार करण्यात वेळ जाईल. त्यामुळे ज्या रोपवाटिकांना शासनाचा परवाना आहे तेथून शेतकरी रोप विकत घेऊ शकतात. ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान मिळेल तसेच ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही त्यांनादेखील मदत देण्याचे विचाराधीन आहे. बागायतदारांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.
-पांडुरंग शेळके, अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply