विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी
नवी मुंबई : बातमीदार
खाजगी हॉस्पिटलमधून उपचाराच्या नावे रुग्णांची होणारी लुट थांववून सर्व रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाले पाहिजेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली. कोरोनाची खरी आकडेवारी लपवून सरकार मोठ्या संकटाला आमंत्रण देत असल्याचा इशारा त्यांनी दिला. प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी नवी मुंबई पालिका हददीतील कोरोना उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी पाहणीदौरा केला त्यावेळी ते बोलत होते.
दरेकर यांच्या समवेत आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, भाजप जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र घरत, ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र इथापे, डॉ. जयाजी नाथ, नेत्रा शिर्के, सुरज पाटील, गणेश म्हात्रे, नवीन गवते, शुभांगी पाटील, माजी नगरसेवक दशरथ भगत आदी उपस्थित होते. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची पालिका मुख्यालयात दरेकर यांनी सर्वप्रथम भेट घेतली. त्यानंतर वाशी येथील पालिका रुग्णालयाला आणि सिडको प्रदर्शनी केंद्रातील कोविड रुग्णालयाला भेट दिली.
सरकार एकीकडे सांगते की, रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत आहे मात्र वस्तुस्थिती अशी आहे की पालिका रुग्णालयात उपचार न मिळाल्याने नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहेत. त्या ठिकाणी लाखो रुपयांची बीले त्यांच्या माथी मारुन लुट केली जाते आहे. हे थांबलं पाहिजे. सर्वांना या योजनेत समावेश करुन घ्या आणि ज्या रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांनी वाढीव बिले आकारली आहेत ती त्यांना परत देण्यात यावीत.
आयुक्तांच्या बदल्यांचे राजकारण होते आहे. राज्य सरकारने हा पोरखेळ चालवला आहे, या शब्दात नाराजी व्यक्त करुन कोरोना वाढण्यास आयुक्तांना जबाबदार धरुन त्यांच्या बदल्या झाल्या तर याच न्यायाने मंत्र्यांच्याही बदल्या व्हायला हव्यात. शासन आणि प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
समन्वय अधिकार्याची नेमणूक
कोविड रुग्णालयांमधून कसे उपचार करुन घ्यायचे याबाबत सर्वसामान्य नागरिक अनभिज्ञ असतात. त्यांच्या मदतीसाठी प्रत्येक रुग्णालयात समन्वय अधिकार्याची नेमणूक करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली असता ही मागणी त्यांनी मान्य केली.
नवी मुंबईत कोरोनाचे आकडे वाढते आहेत. येत्या आठवडाभरात जर पालिका प्रशासनाने कारभारात सुधारणा केली नाही तर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते