केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी
भविष्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई, पुण्याबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीवरील विशेष कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील व्यापार क्षेत्रातील उपलब्ध संधींबाबत माहिती दिली.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, मला भाषिक अथवा प्रांतीय राजकारण करायचे नाही, पण मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी होणे आवश्यक आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे संकट गंभीर बनलेय, हे आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे मुंबईबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेज उभारले गेले पाहिजे. महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असून, कोरोनाच्या संकटानंतरही महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भविष्यात पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील वाहने चालवण्यात यावी, असे स्पष्ट करून समुद्रात आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे, जेणेकरून पर्यटनासाठी लोक येऊन रोजगारनिर्मिती होईल, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
गडकरी यांनी यावेळी, उद्योग, व्यापर, शेती आणि पर्यावरण, आदी क्षेत्रांसदर्भातही भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रासाठी व्यापाराच्या क्षेत्रात कोणकोणत्या वेगळ्या संधी आहेत, याचाही सविस्तर उहापोह केला.