माणगाव : प्रतिनिधी
आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा थोर संस्कृत नाटककार, साहित्यिक महाकवी कालिदास यांचे स्मरण म्हणून जयंती दिन व संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून या वर्षी लॉकडाऊनमुळे समाजमाध्यमातून ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साहित्याचा मधुघट या साहित्यिक समूहातर्फे महाकवी कालिदास दिनानिमित्त ऑनलाइन अभिवादन कार्यक्रम उत्साहात झाला. प्रास्ताविकात कवयित्री उल्का माडेकर यांनी संस्कृत श्लोकाद्वारे कालिदासांच्या साहित्याचा थोडक्यात परिचय दिला. कार्यक्रमाचे उद्घाटक कोमसाप गोरेगाव शाखा अध्यक्ष मंदार म्हशेलकर, तर अध्यक्षा म्हणून कोमसाप दक्षिण रायगड सचिव पूजा वैशंपायन यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. अभिवादन कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या कवयित्री, लेखिका अपूर्वा जंगम होत्या. गझलकार सिद्धेश लखमदे यांनी यानिमित्त काव्यरचना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अजित शेडगे यांनी, तर आभार प्रदर्शन कवी, लेखक, अभिनेता प्रा. प्रणय इंगळे यांनी केले. मुख्य संयोजक गझलकार डॉ. रघुनाथ पोवार व कवी हेमंत बारटक्के यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.