Breaking News

भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना चोख प्रत्युत्तर; पंतप्रधानांचा ‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारत मैत्री निभावतो, मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणेही आम्ही जाणतो. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना लडाखमध्ये जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करीत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आणि नतमस्तक आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसोबतच्या वाढत्या तणावावर भाष्य करून वीरमरण पत्करलेल्या जवानांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी रविवारी (दि. 28) देशवासीयांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

सध्याचा काळ संकटांचा आहे, मात्र संकटांवर मात करण्याची वृत्ती भारतीयांत आहे. 2020 हे वर्ष आव्हानात्मक आहे. आपण अम्फान, निसर्गसारख्या चक्रीवादळांचा सामना केला. कोरोना संकटाला तोंड देत आहोत. याशिवाय लडाखमध्ये कुरघोड्या करणार्‍या शेजार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संपूर्ण जग कोरोनाचा सामना करीत आहे. या काळात भारत जगाची मदत करीत आहे. भारताने कायम बंधुत्वाची भावना जोपासली. कोरोना संकट काळात ती अधोरेखित झाली, मात्र आम्ही देशाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसोबतच्या वाढत्या तणावावर भाष्य केले.

देशाला आत्मनिर्भर करण्याचा मानस पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. लोकलसाठी व्होकल व्हा, या आवाहनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देशवासीयांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नागरिकांचे समर्पण व सहकार्याची आवश्यकता आहे. तुम्ही लोकल वस्तू खरेदी करून त्याच्या प्रसारासाठी शक्य तितके प्रयत्न करा. हीदेखील देशसेवाच आहे. आत्मनिर्भर भारत हीच देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी व्यक्त केली.

  • पी. व्ही. नरसिंहराव यांना अभिवादन

पंतप्रधानांनी काँग्रेसचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना जयंतीदिनी अभिवादन करताना त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव एक सर्वसामान्य राजकीय नेते होते. आपल्या निर्णयावर ते ठाम राहत. त्यांनी 1991 ते 1996 या काळात पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. त्यांनी राजीव गांधी सरकारची समाजवादी धोरणे बदलली. त्यांना आर्थिक सुधारणांचे जनक म्हणूनही ओळखण्यात येते.

  • भारताची स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्यानंतर पूर्व अनुभवांचा जेवढा उपयोग करून घ्यायला हवा होता तेवढा आपण घेऊ शकलो नाही. आज मात्र संरक्षण, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत अग्रेसर आहे. भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने पावले टाकत आहे. भारताचा इतिहासच संकटातून तावून-सुलाखून अधिक झळाळून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्षे अनेक आक्रमकांनी भारतावर आक्रमणे केलीत, मात्र या संकटांतूनही भारत अधिकच भव्य व सक्षम होत बाहेर पडला, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा ‘रयत’कडून गौरव

विद्यमान शैक्षणिक वर्षात सात कोटी 11 लाख रुपयांची देणगी सातारा ः रामप्रहर वृत्त समाजकारणाला महत्त्व …

Leave a Reply