खोपोली : बातमीदार – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक वाहन उलटल्याची घटना सोमवारी (दि. 29) सकाळी मुंबई-पूणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली घडली. अपघातात पोलीस गाडीतील चालकासह एक जण जखमी झाला आहे.
शरद पवार सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ त्यांच्या वाहन ताफ्यातील पाठीमागील वेगात असलेल्या पोलीस व्हॅनचालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात चालक आणि एक अधिकारी जखमी झाला आहे. पाठीमागील गाडी उलटल्याचे लक्षात आल्यानंतर शरद पवार यांनी गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली. दरम्यान, जखमींना पुणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती लोणावळा पोलिसांना कळवण्यात आली आहे.