Breaking News

माणगाववासीय अद्यापही मोफत रॉकेलपासून वंचित

माणगाव ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळ होऊन महिना व्हायला आला तरी अद्याप राज्य शासनाने जाहीर केलेल्या मोफत पाच लिटर रॉकेलपासून माणगाव नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थ वंचितच आहेत.

3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यांबरोबरच माणगाव तालुक्यालाही जोरदार तडाखा बसला. अजूनही तालुक्यातील काही गावांमध्ये वीजप्रवाह खंडित असल्याने अंधार पसरला आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीत सर्वच ठिकाणी निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला.

लोकांच्या पक्क्या व कच्च्या घरांवरील कौले, पत्रे उडून रस्त्यावर विजेचे पोल, तारा, झाडे  कोसळली. त्यामुळे सर्वत्र वीजपुरवठा खंडित झाला होता. ग्रामस्थांनी वीज कर्मचार्‍यांना कामात मदत करून आपल्या भागात लवकरात लवकर कशी वीज येईल यासाठी प्रयत्न केला. एकेक भाग करता नगरपंचायत हद्दीत जवळपास 15 दिवसांनी सर्वत्र वीजपुरवठा सुरळीत झाला.चक्रीवादळानंतर शासनाकडून पाच लिटर रॉकेल देण्याचे जाहीर करण्यात आले होते. हे रॉकेल जून महिना निघून गेला तरी अद्याप माणगाववासीयांना मिळाले नाही. कोरोना संकटामुळे जारी करण्यात आलेले लॉकडाऊन व नंतर निसर्ग चक्रीवादळामुळे गोरगरीब जनतेचे पुरते हाल झाले आहेत. गरीब जनतेला रॉकेल फार महत्त्वाचे आहे. अनेक गरिबांकडे गॅस उपलब्ध नसून ते रॉकेलच्या साहाय्याने चूल अथवा स्टोव्ह पेटवून स्वयंपाक करतात. याकडे शासनाने लक्ष देऊन माणगाववासीयांना लवकरात लवकर मोफत रॉकेलची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply