Breaking News

कोरोना, कोरोना आणि कोरोना!

टीव्ही लावा कोरोनाची बातमी, व्हॉट्सअ‍ॅप उघडा कोरोनाबद्दल माहिती, कुणी भेटले तरी कोरोनाचे नाव काढल्याशिवाय राहत नाही. घरादारात कोरोनाच्याच गप्पा. इतकेच नव्हे तर कोरोनावरून जोक्ससुद्धा आपण ऐकतो, वाचतो. दहाही दिशेला कोरोनाचाच विषय. या कोरोनाने जीवनशैली बदलून टाकली आहे. भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाजसुद्धा कुणाला लावता येत नाही. इतका महाभयंकर हा कोरोना आहे. त्याच्यावर अजूनही प्रभावी औषध निघाले नाही. या विषाणूने सर्वांचीच झोप उडवली आहे. आज या कोरोनाला 100 दिवस होत आहेत. त्यानिमित्ताने…

कोरोनाचा प्रादुर्भाव भारतातही पसरला. सुरुवातीला त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही, मात्र कोरोनाने झपाट्यानेहातपाय पसरले आणि सर्वच जागे झाले. 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सुरुवातीला विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली. त्यानंतर सरकारी व खासगी वाहतूक बंद केली. कधी नव्हे ती रेल्वेसेवासुद्धा बंद झाली. शाळा-महाविद्यालयांतील परीक्षाच झाल्या नाहीत, तर अनेकांची कामे सध्या ठप्प झाली आहेत.

ज्यांना शक्य आहे त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सवलत मिळाली, परंतु प्रत्यक्ष कंपनीत कामासाठी जाणार्‍या कामगारांवर दळणवळण सुविधेअभावी उपासमारीची वेळ आली आहे. व्यापारीवर्गसुद्धा यामध्ये भरडला गेलाय. शाळा सुरू नसल्याने ऑनलाइन शिक्षण पद्धतीने पालकांचे कंबरडे मोडलेच, शिवाय मोबाइलवर सातत्याने पाहून पाहून भविष्यात चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे काय होईल ते काळच जाणे.

विवाह सोहळ्यांवर केवळ 50 माणसांचे बंधन आल्याने व थाटात हळदी समारंभ नसल्याने मंडप नाही, बेंजो नाही, डीजे नाही, जेवणावळी नाहीत. त्यामुळे लग्नाचे हॉल, रिसॉर्टमधील अनेक जण बेरोजगार झाले. अंत्यसंस्कारालाही 20 जणच उपस्थित राहू शकतात. मंदिरे बंद झाल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या.        

पर्यटनस्थळे बंद असल्याने तेथील सर्वच जण अगदी गाइडपासून साधे लॉज, हॉटेल्स, पंचतारांकित हॉटेल्स बंद पडली. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. सुटीचा मोसम असूनही कुठे बाहेर पडता येत नाही. त्यातून गृहिणी आणि लहान मुलांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांना घरातच कोंडून ठेवावे लागत आहे. पोलीस विभाग आणि आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना कोरोनाने ग्रासल्याने सर्वच परिस्थितीवर ताण आला.

एकंदर राव असो की रंक कोरोनाने सर्वांना जमिनीवर आणले आहे. मास्क, सॅनिटायझर जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. खरंतर आपल्याला पुन्हा उभे राहण्यासाठी कोरोनाशी जुळवून घेणे फायद्याचे ठरेल; नाहीतर बुडत्याचा पाय खोलात गेल्याशिवाय राहणार नाही.

-विजय मांडे, कर्जत

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply