Breaking News

किरकोळ बाजारात भाज्या-फळांचे दर दुप्पट

पनवेल : बातमीदार – पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झालेल्या दरवाढीने सर्वत्र संताप व्यक्त होत असताना राज्यातील किरकोळ बाजारात कोरोनासारख्या महासाथीचा गैरफायदा घेत धान्य आणि भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात काही विक्रेत्यांनी भरमसाठ वाढ केल्याचे दिसून येत आहे.

घाऊक बाजारात आठ रुपये प्रति किलो असलेला कांदा किरकोळ बाजारात चाळीस रुपये किलोने विकला जात आहे, तर साठ रुपयांचा लसूण तिप्पट दराने खरेदी करावी लागत आहे. काही प्रमुख भाज्यांसाठी दुप्पट दर आकारले जात आहेत. किरकोळ बाजारावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने ग्राहकांना ही दरवाढ निमूटपणे सहन करावी लागत आहे. ‘एपीएमसी’ घाऊक बाजारात कांदा, बटाटा, लसूण, तांदूळ, गहू, तूरडाळ, मसूरडाळ, तेल, साखर, नारळ, अनेक भाज्या यांचे दर गेल्या काही महिन्यांत स्थिर आहेत. मुंबई आणि उपनगरांतील किरकोळ बाजारात मात्र त्यांचे दर दुप्पट किंवा तिप्पट आकारले जात आहेत. भेंडी, फ्लॉवर, कोबी, गाजर, टोमॅटो या सर्वाधिक मागणी असलेल्या भाज्या 80 ते 120 रुपये किलोने किरकोळ बाजारात विकल्या जात आहेत मात्र या भाज्या घाऊक बाजारात 20 ते 30 रुपये प्रति किलो आहेत.

घाऊक बाजारात कांदा आठ रुपये किलो असताना किरकोळ बाजारात तो 30 ते 40 रुपयांनी विकला जात आहे. बटाट्याचा भाव प्रति किलो 19 रुपये असताना तो 30 ते 35 रुपयांनी विकला जात आहे. लसूण साठ रुपये किलो आहे. किराणा दुकानात तो 180 ते 200 किलोने विकला जात आहे. 25 रुपये किलोचा तांदूळ 60 ते 70 रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. मसूर आणि तूर डाळीचा दरही 30 ते 40 रुपये अधिक आहे. 20 ते 25 रुपये दराने मिळणार्‍या नारळास किरकोळ विक्रेते 40 रुपये आकारत आहेत.

कोरोनाकाळात आयुष मंत्रालय जाहीर केलेल्या उपचार पध्दतीमुळे आले आणि हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे 50 रुपये किलो असलेले आले किरकोळ भाजी विक्रेते 120 ते 140 रुपये किलोने विकत आहेत तर हळदही 220 ते 250 रुपये किलोने मिळत आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फळांचे सेवन होत आहे. त्यामुळे फळांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. 90 ते 105 रुपये किलोने मिळणारे हिमाचल सफरचंद किरकोळ बाजारात 150 ते 200 रुपये किलोने खरेदी करावी लागत आहेत. 47 रुपये प्रति किलो असलेले डाळींब किरकोळ बाजारात दीडशे रुपयांना विकले जात आहेत. केळी 50 रुपये डझनापेक्षा कमी किमंतीत मिळत नाहीत.

– आरती शिंदे, गृहिणी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply