Breaking News

रुग्णांची लूट थांबवा!

देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारला विनंती

ठाणे : प्रतिनिधी
कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या वेगवेगळ्या भागांमधील रुग्णालयांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. फडणवीस यांनी सोमवारी
(दि. 6) ठाण्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णांची होणारी लूट थांबवा, अशी विनंती राज्य सरकारला केली.
फडणवीस म्हणाले, पनवेल, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर अशा सर्वच ठिकाणी संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्येत मुंबई व एमएमआरमधील 70 टक्के रुग्ण, तर मृत्यूसुद्धा याच भागात अधिक आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत चाचण्या वाढविण्याची गरज आहे तसेच त्याचे अहवाल तत्काळ आले पाहिजेत.
मृत्यूदर वाढणे ही बाब अधिक चिंताजनक आहे. राज्यातील महापालिकांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात मिळायला दिली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांकडून लूट थांबविणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयसीसीयू बेड कमी पडत आहेत. दुसरीकडे रुग्ण व्यवस्थापनही कमी पडत आहे. ठाण्यातून दोन ते तीन रुग्ण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे नातेवाईक मला आज भेटले, असे फडणवीस यांनी सांगितले.
देशातील संसर्गापेक्षा महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. कमी चाचण्या हेच राज्यातील कोरोना वाढ होण्यामागील मुख्य कारण आहे असे सांगून, अजूनही खरी मृत्यूसंख्या पुढे आलेली नाही. मुंबईतील 400 मृत्यू अद्यापही पुढे आलेले नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केला.
सरकार अंतर्गत वादातूनच पडेल
आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही. हे सरकार आम्ही कधीही पाडणार नाही, तर महाविकास आघाडीचे सरकार अंतर्गत वादातूनच पडेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आम्हाला सरकार पाडण्यापेक्षा राज्यातील 12 कोटी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे सांगून कोरोनापासून जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी संजय राऊत असे काही तरी लिखाण करतात आणि मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
बदल्यांमध्ये समन्वय नाही
पोलिसांच्या बदलीबाबत समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक पाहता पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करीत असताना सीपी हे गृहमंत्र्यांशी चर्चा करतात. त्यानंतर गृहमंत्र्यांनी याची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायची असते, परंतु असे काही झालेलेच दिसत नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एकूणच समन्वयाच्या अभावामुळे किंवा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे वेगळे असल्याने असा प्रकार घडला असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
केंद्राकडून निधी मंजूर
केंद्राकडून कोविड-19 नियंत्रणासाठी नऊ हजार कोटींचा आरएसीच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे. राज्य सरकारला हा निधी मिळू शकते, पण तो मिळविण्याऐवजी उलट केंद्र सरकारकडेच मंत्री नितीन राऊत बोट दाखवून केंद्राने काहीच मदत केली नसल्याचा गवगवा करीत आहेत. आतापर्यंत महामारीच्या काळात एवढी मदत झालेली नव्हती, परंतु ती मिळविण्याऐवजी नको त्या विषयांना खतपाणी घातले जात असल्याचेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply