रोहे ः प्रतिनिधी
रोहा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने रोहेकरांची चिंता वाढली आहे. रोहा तालुक्यात रविवारी (दि. 12) 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. शहरात आठ व ग्रामीण भागात 19 असे एकूण 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात नऊ महिला व 18 पुरुषांचा समावेश आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जनजागृती करणे, बाजारपेठ बंद ठेवणे, फवारणी करणे, सॅनिटायझर व मास्क वाटप आदी उपाययोजना सुरू आहेत. तरीही रोहा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे. रविवारी रोह्यात 27 कोरोनाबाधित आढळल्याने तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 267 झाला आहे. तीन व्यक्ती कोरोनावर मात करून घरी आल्याने कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 166 झाली आहे. कोरोनामुळे रविवारी एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने रोहा तालुक्यात मृतांची एकूण संख्या तीन झाली आहे.