देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राज्यातील नागरिकांच्या वीज बिलाची समस्या मांडली आहे. लॉकडाऊन काळात ग्राहकांच्या घरातील मिटरचे रिडिंग न घेतल्यामुळे सध्या एकदम तीन महिन्यांचे बिल नागरिकांच्या माथी मारले जात असून, हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सर्वसामान्य नागरिक व औद्योगिक ग्राहकांची कैफियत मांडली आहे. वीज बिलांचा घरगुती ग्राहकांवर नाहक भूर्दंड टाकून सरसकट तीन महिन्यांची वीज बिले दिल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे, तर दुसरीकडे औद्योगिक ग्राहकांचीही हीच परिस्थिती असून, तीन महिने उद्योग बंद असतानाही भरमसाठ वीज बिल आकारण्यात येत आहे. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना नाहक भूर्दंड सोसावा लागत आहे.
ग्राहकांकडून सक्तीने तीन महिन्यांचे वीज बिल न घेता टप्प्याटप्प्याने सुयोग्य मासिक हफ्त्यात त्यांना ते भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.