कर्जत ः बातमीदार
रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रायगड जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यात येणार्या तिन्ही जिल्हा सीमा पोलिसांकडून बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील दोन मोठ्या आणि चार लहान अशा सर्व बाजारपेठा बंद असून गुरुवारी (दि. 16) सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील माथेरान पर्यटनस्थळ 100 टक्के बंद असून, तेथे बाहेरून येणार्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही व्यक्तींना परवानगी नाही. दस्तुरी नाका येथून बाहेरचे व्यक्ती किंवा कामगारांना परत पाठविले जात आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कर्जत तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे रस्ते तसेच येथे कर्जत आणि नेरळ पोलिसांनी सीमा हद्द बंद केल्या आहेत. कर्जत पोलिसांनी चौक-कर्जत रस्त्यावर तालुका हद्द सुरू होते तेथे बंदोबस्त लावला आहे, तर नेरळ पोलिसांनी कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील शेलू येथील आणि मुरबाड-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील जिल्हा हद्द बंद केली आहे. या तिन्ही सीमा हद्दीत पोलिसांकडून कोणत्याही अन्य जिल्ह्यातील वाहनांना प्रवेश दिला जात नाही. केवळ मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणार्यांनाच परवानगी देण्यात येत आहे. शेलू, कळंब व कर्जत येथे पोलिसांकडून सीमा हद्दीत बॅरिकेट्स लावण्यात आले असून पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अरुण भोर, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील आपल्या पथकासह तालुक्यात बंदोबस्त ठेवून जमावबंदी आदेशाचे पालन करण्यासाठी आग्रही आहेत. 21 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असून त्याआधी अमावस्येपर्यंत मांसाहार विक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल खाटिक समाज संघटनेने केली होती, मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नाही. कर्जत शहरातील कर्जत व दहिवली येथील बाजारपेठ 100 टक्के बंद असून त्याखालोखाल मोठी असलेली नेरळ बाजारपेठही बंद आहे. तालुक्यातील कडाव, कशेले, डिकसळ व कळंब येथील लहान बाजारपेठाही लॉकडाऊनमध्ये बंद असणार आहेत. बाजारपेठेत रस्त्यावर बसणार्यांना व्यवसायास बंदी घालण्यात आल्याने ग्रामीण भागातून पिकवलेल्या शेतमालाची विक्रीही बंद आहे. शासनाने तहसीलदारांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेत असलेले दूध, किराणा यांना ऑनलाइन नोंदणी करून घरपोच विक्री करण्याची परवानगी दिली आहे, मात्र घरपोच विक्रीसाठी दुकान उघडले असता पोलिसांचा खाक्या आड येत आहे. त्यामुळे व्यापार्यांच्या मनात कारवाईची भीती आहे.