नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
सुनियोजित शहराचा बहुमान मिळविलेल्या नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 10,273 झाली आहे. 125 दिवसांमध्ये दहा हजारांचा टप्पा पूर्ण झाला. आतापर्यंत 318 जणांना प्राण गमवावे लागले असून, प्रसार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. अपयश झाकण्यासाठी राज्य शासनाने आयुक्तांची बदली केली असून, नवीन आयुक्त नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान कसे पेलणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबईमध्ये 13 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलीपाइन्सवरून आलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यापासून त्याचे इतर सहकारी व वाशीमधील एका कुटुंंबातील जवळपास सात जणांना लागण झाली. पहिला रुग्ण आढळल्यानंतर दुसजयाच दिवशी रुग्ण सापडलेल्या परिसरात जाणारे रस्ते सील करण्यात आले. रोडसह सर्व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. शहरातही कोरोनाचे आगमन झाले असल्यामुळे, महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. यानंतर, देशभर लॉकडाऊन सुरू झाला, परंतु त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी नवी मुंबईमध्ये झाली नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती व शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रीची दुकाने सुरूच राहिली. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली व कोरोना रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढतच गेली. 43 दिवसांनी 24 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांचे पहिले शतक पूर्ण झाले. पहिला रुग्ण आढळल्यानंतर 64 दिवसांनी एक हजाराचा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर, रुग्णांची वाढ झपाट्याने होत गेली व 15 जुलैला रुग्णांचा आकडा दहा हजार झाला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. रुग्णांची संख्या पाच हजार झाल्यानंतर, 23 जूनला मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची शासनाने बदली केली, परंतु स्थानिक नेत्यांनी ही बदली थांबविली. यानंतर, 14 जुलैला रुग्णसंख्या दहा हजारांच्या टप्प्यावर पोहचल्यानंतर पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिकेच्या कागदावर रुग्णांसाठी पुरेशी व्यवस्था आहे, परंतु प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध होत नाही. आयसीयू युनिटची संख्या कमी आहे. ऑक्सिजनची व्यवस्था असणाजया बेडची संख्याही कमी पडत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांवर पोहोचले असले, तरी कोरोनाबळींचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढत आहे. नवीन आयुक्त अभिजीत बांगर कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील कोरोनाची स्थिती
चाचण्या – 27,713
निगेटिव्ह – 16,740
रुग्ण – 10,546
मृत्यू – 322
कोरोनामुक्त – 6,520
उपचार सुरू – 3,704