ऐतिहासिक विजयानंतर ‘डब्ल्यूटीसी’मध्ये अग्रस्थानी
दुबई : वृत्तसंस्था
भारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्या हंगामात पाकिस्तानला मागे टाकले आहे. विराटसेनेकडे आता पहिल्या क्रमांकाची खुर्ची आहे. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 157 धावांनी जिंकला. या संस्मरणीय विजयाच्या आधारावर भारताला 26 गुण आणि 54.17 अशी टक्केवारी मिळाली. यामुळे भारताने अव्वल स्थान मिळवले.
पॉईंट टेबलमध्ये प्रत्येकी 12 गुणांसह भारतापाठोपाठ पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज आहे. दोघांना 50 टक्के गुण आहेत. इंग्लंड 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या गुणांची टक्केवारी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या तुलनेत केवळ 29.17 अशी आहे.
प्रत्येक कसोटी सामन्यात विजयासाठी 12 गुण दिले जातात. सामना गमावणार्या संघाला कोणतेही गुण मिळत नाहीत. दुसरीकडे जर आपण गुणांच्या टक्केवारीबद्दल बोललो, तर जिंकण्यावर 100 टक्के, टायवर 50 टक्के आणि ड्रॉवर 33.33 टक्के मिळतात.
ओव्हल कसोटीच्या निकालापूर्वी भारत आणि इंग्लंड या दोघांनाही संथ गतीमुळे 2-2 गुण गमवावे लागले. या कारणास्तव तीन कसोटी सामन्यांनंतर दोघांचे 14 गुण होते. इंग्लंडला चौथ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे त्यांचे फक्त 14 गुण असतील, परंतु भारताला गुणांचा फायदा आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचा उपविजेता संघ आहे. न्यूझीलंडने भारताला हरवून जेतेपद पटकावले होते.