कळंबोली : प्रतिनिधी
स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची जनतेत ओळख आहे. त्यांनी पनवेलचा कायापालट केला. तेव्हा 21 ऑक्टोबरला त्यांच्या कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून मतदान करा आणि माझ्या या मित्राला व तुमच्या लाडक्या आमदाराला प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे केले.
भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 13) कळंबोलीत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. स्वच्छ चारित्र्याची माणसे राजकारणात टिकली, तर लोकशाही टिकेल व आपला देश प्रगतिपथावर कायम असेल.
त्यामुळे चारित्र्यसंपन्न आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याची विनंती करायला येथे आलो आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांना तमाम जनता दानशूर म्हणून ओळखते. त्यांचे उपकार आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करून फेडायचे आहेत, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात शेकापवर सडकून टीका केली. यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी असणार्या ग्रामपंचायती सोडायच्या नव्हत्या म्हणून यांनी महानगरपालिकेला तीव्र विरोध केला, पण मला महापालिकेच्या माध्यमातून पनवेलचा विकास करायचा आहे आणि तो मी करणारच, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. काँग्रेसचा समाचार घेताना ते म्हणाले की, काँग्रेसने अनेक वर्षे राज्य व केंद्रातील सत्ता उपभोगली, मात्र गरिबी काही हटली नाही. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहर तसेच गावांचा विकास होत आहे. महायुतीचे सरकार 2015पर्यंतची बांधकामे नियमित करणार आहे. त्यासाठी मीसुद्धा प्रयत्नशील आहे.
कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, वर्षा भोसले यांनी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेस राजस्थानमधील आमदार जोलाराम कुमावत, रिपाइंचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल पाटील, भाजप शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक संजय भोपी, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, नगरसेविका विद्या गायकवाड, प्रमिला पाटील, तसेच बुधाजी ठाकूर, अशोक मोटे, अतुल पाटील, राजू बनकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
भाजप सरकार जनतेचे सरकार : नरेंद्र पाटील या वेळी माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, भाजप सरकार जनतेचे सरकार आहे. ते पुढे म्हणाले, येथील घरे धोकादायक अवस्थेत आली आहेत. त्यांच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेहनत घेतली आहे. अशा अनेक बाबी मार्गी लागणार असून, पनवेलला सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा विधानसभेत पाठवा.