Breaking News

राम मंदिराची उभारणी

अयोध्येत राम मंदिराच्या बहुप्रतिक्षित शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे’ ही घोषणा आता प्रत्यक्षात साकार होणार आहे.

राम मंदिर जन्मभूमीचा मुद्दा गेली अनेक वर्षे न्यायालयात प्रलंबित होता. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मितीच्या कार्याला मंजुरी देण्यात आली. राम मंदिर-बाबरी मशीद वादात सर्वोच्च न्यायालयाने विवादित जागा हिंदू पक्षकारांना दिली, तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्या परिसरात 2.7 एकर जागा देण्याचे सरकारला सांगितले. त्यानंतर देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणार्‍या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली असून, 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहतील. राम मंदिर उभारले जात असताना ते कशा पद्धतीने बांधले जाणार याचीही अनेकांना उत्सुकता आहे. ट्रस्टच्या बैठकीत त्यावरही चर्चा करण्यात आली. त्यानंतर आधीच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. जमिनीत 60 मीटर खोदकाम करून मंदिराचा पाया भक्कम करण्यात येणार आहे. शिखरापर्यंतची उंची 138 फुटांवरून 161 फुटांपर्यंत झाली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही आकार वाढणार आहे, तर गर्भगृहापासून शिखराची उंची 138 फूटाऐवजी 161 फूट इतकी असणार आहे. आधीच्या रचनेत दोनच घुमटांची रचना होती. त्याऐवजी आता पाच घुमट असणार आहेत. याशिवाय अन्य छोटे-मोठे बदल केले जाणार आहेत. त्यामुळे खर्चातही प्रारंभीच्या 80 कोटींच्या अंदाजापेक्षा वाढ होईल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर निर्माणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी संतांची इच्छा आहे, तर दुसरीकडे बाबरी मशिदीचे इक्बाल अन्सारी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अयोध्येत स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिर निर्मितीसाठी तीन महिन्यांत ट्रस्ट उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये या ट्रस्टची स्थापना झाली. नंतर रामनवमीचा एखादा मुहूर्त शोधून काम सुरू करण्याचा समितीचा मानस होता, मात्र कोरोना संकटामुळे हा संकल्प लांबणीवर पडला. त्यानंतर आता मुहूर्त ठरला आहे. या मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. या दृष्टीने त्यांनी होऊ घातलेल्या विकासकामांचा आढावा घेतला असून, ही कामे टप्प्याटप्प्याने केली जातील, असे योगींनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापन करण्यात आलेली आहे. यामध्ये नृपेंद्र मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यांचा समावेश आहे. या समितीने मंदिर उभारणीसाठी वेग घेतला असून, पंतप्रधानांच्या हस्ते 5 ऑगस्टला विधिवत पूजा झाल्यावर या भव्य अशा मंदिराची पायाभरणी केली जाईल आणि बांधकाम सुरू होईल. या मंदिराच्या निमित्ताने देशवासीयांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या पूजा-अर्चा, आराधनेसाठी महत्त्वपूर्ण असे एक तीर्थक्षेत्र उपलब्ध होणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply