खालापूर : प्रतिनिधी
वर्षानुवर्ष व्हेंटीलेटरवर असलेली खालापूर तालुक्यातील आरोग्य सेवेचा पंचनामा कोरोनानी मांडला असून कोरोनामुळे पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या थैमानात व्हेंटीलेटरची, बेडची सोय प्रशासन करू शकलेले नाही. नियमावर बोट दाखवत रूग्णांच्या जिवाशी खेळ मात्र सुरूच आहे. यामुळे राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे.
कोरोना महामारीच संकटापूर्वी देखील तालुक्यातील रूग्णालये आजारी होती. तालुक्यात खालापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून वावोशी व लोहप, बोरगाव येथे उपकेंद्र आहे. हि सर्व जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहेत. तर चौक येथे ग्रामीण रूग्णालय असून राज्यशासनाचे नियंत्रण आहे. परंतु सर्वच ठिकाणी डॉक्टर, कर्मचारी यांची अपुरी संख्या, अत्यावश्यक तपासणी यंञसामुग्रीची कमतरता यामुळे रूग्णांची हेळसांड सुरूच होती.
खालापूर तालुक्याचा प्रचंड विस्तार असताना देखील कोरोना रूग्णासाठी कोणतीच उपाययोजना प्रशासनाने तालुक्यात केली नाही यापेक्षा जास्त निष्काळजीपणा नसेल. सध्याच्या कोरोना परिस्थितीत देखील तालुक्यात आरोग्य यंत्रणेकडे एकाही व्हेंटीलेटर बेडची सोय नसून केवळ ऑक्सिजनची सोय असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद रोकडे यांनी सांगितले. खोपोलीसारख्या शहरात दररोज कोरोनाबाधित रूग्ण आढळत असताना केवळ 43 बेडची व्यवस्था असून प्राथमिक उपचार केले जात आहेत. केएमसी येथे ऑक्सिजनची व्यवस्था शनिवारपासून करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
खालापूर तालुक्यात कोविड रुग्णालय करण्यासाठी पत्रकार मनोज कळमकर हे उपोषण करणार आहेत. हे रुग्णालय येत्या पंधरा दिवसात सुरु करावे. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या ह्या आमरण उपोषणाला अखिल गुरव समाज संघटनेचा पाठिंबा असेल, असे संघटनेचे कोकण विभाग युवाध्यक्ष अमोल गुरव यांनी सांगितले.
खालापूरला कोविड केंद्रासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.खालापूर नगरपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने योग्य जागा शोधून सध्या प्राथमिक अवस्थेत असलेला रूग्ण उपचारासाठी इंडिया बुल तसेच पनवेल ऐवजी खालापूरात राहील असे प्रयत्न आहेत.
-इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर