कर्जत : बातमीदार – पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर काही दिवस उलटताच वरुणराजाने उघडीप दिली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे. तालुक्यात पावसाची आतापर्यंत सरासरी केवळ 30 टक्के इतकीच असल्याने बळीराजा संकटात चिंतेत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी जुलै महिना हा मुसळधार पावसाचा असतो. या वेळी नदी-नाले ओसंडून वाहून पूरही येतो. यंदा मात्र कर्जत तालुक्यात अद्याप सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या नाहीत. तालुक्यातील पावसाची सरासरी 993 मिलीमिटर इतकी आहे. गतवर्षी आजच्या दिवशी तालुक्यात 1436 मिलीमिटर इतका पाऊस झाला होता. याचाच अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 50 टक्के घट आहे. त्यातच आता कडक ऊन पडू लागले आहे.
शेतीचा हंगाम सुरू होत असताना 8 जून रोजी पावसाने हजेरी लावली, पण तो सातत्य कायम ठेवू शकला नाही. त्यानंतर वरुणराजाने 15 जूननंतर दडी मारल्याने भाताची रोपे जगविताना शेतकर्यांच्या नाकी नऊ आले होते. मग जूनच्या अखेरीस चांगला पाऊस पडला आणि बळीराजा लावणीची कामे करू लागला. या वेळी पावसाने हजेरी कायम ठेवली, मात्र त्यात फारसा जोर नव्हता. आता अर्धा जुलै महिना लोटला तरीही हवी तशी पर्जन्यवृष्टी झालेली नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पाऊस वगळता कर्जत तालुक्यात वरुणराजा बरसलेला नाही.
पावसाअभावी अद्याप काही मोठ्या शेतकर्यांची भातलावणीची कामे संपलेली नाहीत. पाणी नसल्याने या शेतकर्यांनी लावणीची कामे थांबविली आहेत. तालुक्यातील पावसाची एकूण सरासरी लक्षात घेता 3500 मिलीमिटर पाऊस या वर्षी होईल का, याबाबत शंका निर्माण झाली आहे.