महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यात भरमसाठ वाढणार्या कोरोनाबाधितांच्या संख्येला ब्रेक लागला असून मंगळवारी (दि. 21) तब्बल 22 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाड तालुक्यासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. मंगळवारी केवळ तिघांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाबाधितांमध्ये महाडमधील 65 वर्षीय पुरुष, शिंदेकोंड कांबळे तर्फे महाड 26 वर्षीय पुरुष आणि बिरवाडीतील 30 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 63 रुग्ण कोरोना संसर्गावर उपचार घेत असून, 126 रुग्ण बरे झाले आहेत. महाडमध्ये एकूण 204 रुग्णांची नोंद झाली आहे.
कर्जतमध्ये चार जण पॉझिटिव्ह
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. मंगळवारी (दि. 21) त्याला थोडा ब्रेक मिळाला. मंगळवारी चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. तालुक्यात आतापर्यंत 351 रुग्ण आढळले असून 261 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मंगळवारी कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगावमधील एक 67 वर्षांच्या वयस्कर व्यक्तीचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती एसटी आगरासमोर छोटेसे दुकान चालविते. कोतवाल नगरमधील एका 60 वर्षीय व्यक्तीलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती बारदान खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते, तर मुद्रे बुद्रुकमधील सुमित अंगन इमारतीत राहणार्या एका 45 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. निकोप गावातील एका 51 वर्षीय महिलेलासुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे.
उरणमध्ये तिघांचा मृत्यू; 16 नवे कोरोनाबाधित
उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यात कोरोनाने हैदोस माजविला असून कोरोनामुळे मंगळवारी (दि. 21) विंधणे येथील 78 वर्षीय पुरुष, करंजा येथील 58 वर्षीय महिला आणि डोंगरी येथील 40 वर्षीय पुरुष या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उरणमधील कोरोना मृतांचा आकडा 21वर पोहचला आहे. तसेच 16 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.
नवघर, धुतूम, जेएनपीटी, उरण, जांभूळपाडा, चिर्ले, चिरनेर व कोटनाका तसेच जसखार, वैश्वी, प्रभात को. ऑ. सोसायटी मिळून एकूण 16 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. 15 रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. उरण तालुक्यात आजपर्यंत 657 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 474 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.
162 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली, मात्र कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बाधितांचा आकडाही थांबत नसल्याने उरण तालुक्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवी मुंबईत 301 रुग्ण कोरोनामुक्त
नवी मुंबई ः नवी मुंबईत मंगळवारी 301 जण कोरोनामुक्त झाले, तर 254 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 11 हजार 966 झाली आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या सात हजार 718 झाली असून नवी मुंबईचा रिकव्हरी रेट एक टक्क्याने वाढून 64 टक्क्यांवर स्थिरावला आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 29 हजार 998 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 17 हजार 664 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत तीन हजार 896 रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 352 झाली आहे. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 19, नेरूळ 61, वाशी 35, तुर्भे 14, कोपरखैरणे 43, घणसोली 31, ऐरोली 48 व दिघा तीन असा समावेश आहे.