महावितरणवर अंकुश ठेवण्याची नागरिकांची मागणी

पनवेल : बातमीदार
जून महिन्यात नागरिकांना हजारोंच्या पटीत वीजबिले धाडणार्या महावितरणकडून या महिन्यातही पुन्हा हजारो रुपयांची बिले धाडण्यात आली आहेत. दरम्यान, महावितरणच्या या मनमानीवर अंकुश घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात कर्मचार्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यभरात मीटरचे रीडिंग न घेताच नागरिकांना सरसकट बिले धाडली जात होती. ही बिले भरल्यानंतरही जून महिन्यात युनिट रीडिंग घेऊन मागील तीन महिन्यांच्या वीजवापरासाठी एकत्रित बिले धाडण्यात आली. यामुळे नागरिकांना एक ते 10 हजारांपर्यंत रकमेची वीज बिले मिळाली. लॉकडाऊनमुळे आधीच नागरिकांच्या उत्पन्नावर मर्यादा आलेली असताना इतक्या मोठ्या रकमेची बिले भरायची कशी, असे संकट नागरिकांना पडले होते. यानंतर वीजग्राहकांनी मोर्चा, आंदोलने, निवेदने देत तसेच वैयक्तिक भेट घेऊन महावितरणच्या अधिकार्यांना जाब विचारला. मात्र अधिकार्यांनी आपण पाठवलेली बिले कशी बरोबर आहेत, याचे स्पष्टीकरण देऊन नागरिकांना बिले भरण्याचे आवाहन केले. पुढे तीन टप्प्यांत बिल भरण्याची सवलत देण्याचे आमिष दाखवत यावरही व्याज भरावे लागणार असल्याचे सांगितले गेल्याने नागरिकांचे पुरते कंबरडे मोडले. अखेर निम्म्याहून अधिक नागरिकांनी हजारो रकमेच्या बिलांचा भरणा केला. मात्र तरीही या महिन्यात पुन्हा नागरिकांना हजारो रुपयांची बिले धाडण्यात आल्याने नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
कमाई नसताना इतक्या मोठ्या रकमेची बिले भरायला पैसे कोठून आणायचे, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. मागील महिन्यात बिले भरूनही पुन्हा इतक्या रकमेची बिले धाडण्यात आल्याने नागरिक संतापले. या महिन्यात धडलेली बिले चुकीची असून ती दुरुस्त करून दिल्याखेरीज बिले भरणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. नागरिकांची लूट करणार्या महावितरणवर अंकुश ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
विजेच्या खेळखंडोब्याने ग्रामीण जनता त्रस्त
पनवेल : वार्ताहर
गेल्या काही महिन्यांपासून पनवेल परिसरातील ग्रामीण भागात वीजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने ग्रामस्थ चांगलेच त्रस्त झाले असून वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील नेरा विभागातील कोडले, मोरबे, वाकडी, खानाव, खैरवाडी, करबेली, यलमाल, गारमाल या भागाचा विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. या ठिकाणी दररोज तीन ते चार तास वीज गायब होते. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत असून उद्योगधंदे करणार्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो. सध्याच्या पावसाच्या दिवसात वीजपुरवठा खंडीत होत असल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. यातून रोगराई वाढत चालली आहे. याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो याच त्याचप्रमाणे लॉकडाऊनचा काळात वाढीव वीज बिले दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.