सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या मागणीला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यासंदर्भात लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीने अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीला यश आले आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सिडकोकडे मागणी करण्यात आली होती.
सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सिडको विकसित करीत असलेल्या उलवे नोड, उरण, पनवेल परिसरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. येथे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम नाही. क्वारंटाइन सेंटरही या ठिकाणी नाही. जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा हतबल झालेली आहे. रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याने अनेक लोक उपचाराविना घरीच थांबून आहेत. अशात काही खासगी रुग्णालयांत रुग्णांची अक्षरश: लूटमार सुरू असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दररोज येत आहेत. त्यामुळे उरण, पनवेल, उलवे नोड येथील नागरिकांना तातडीने कोविड हॉस्पिटलची गरज आहे तसेच त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, बेड, (आयसीयू) यांची उभारणी करण्याची गरज आहे, जेणेकरून अत्यावश्यक रुग्णाला तिथल्या तिथे उपचार मिळतील आणि त्याचा जीव वाचेल. या अगोदर सिडकोने मुलूंड येथे दोन हजार बेड्सचे आणि ठाणे येथे 1600 बेड्सचे अद्यावत असे तात्पुरत्या स्वरुपाचे कोविड हॉस्पिटल उभारले आहे, परंतु पनवेल, उरण तालुक्यांतील शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्यांना मात्र सिडकोने वार्यावर सोडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने मुलूंड, ठाण्याच्या धर्तीवर नवी मुंबई, उलवे नोड, उरण, पनवेल परिसरातही कोविड हॉस्पिटल उभारावे यासाठी लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडको व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करण्यात आला.
याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दि. 24) लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय समितीचे उपाध्यक्ष बबन पाटील व सचिव कामगार नेते महेंद्र घरत यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची भेट घेऊन या ठिकाणीची गंभीर परिस्थिती सांगितली व संबंधित मागणीचे पत्र त्यांना देण्यात आले. लोकेश चंद्र यांनी या पत्राची तत्काळ दखल घेऊन उलवे नोड सेक्टर 7 येथे रिलायन्स कंपनीची जी दोन अद्ययावत व्यावसायिक संकुले आहेत तेथे सर्व सोयीसुविधांयुक्त कोविड हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून, यासाठी तातडीने 10 कोटी रुपये मंजूर केले तसेच अधिक मदत लागली तरी सिडको आपल्याला सहकार्य करण्यासाठी
तयार आहे, असे आश्वासन दिले. अशा प्रकारे लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष बबन पाटील, सचिव महेंद्र घरत व समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.