Breaking News

जयराम पाटील : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ संघटक

गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक जयराम पाटील यांचे 20 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ संंघटक आणि विचारवंत आपल्यातून हरपला आहे. सहकारातून बहुजन समाजाला व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला थोडा तरी आर्थिक आधार देऊन उभे करता येईल व त्यातून या घटकातील लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करता येईल, या भावनेतून सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव पाटील यांनी अतिशय परिश्रमपूर्वक कळवा परिसरात पारसिक सहकारी बँकेची स्थापना करून ती बँक नावारूपाला आणली, त्या गोपीनाथरावांचे जयराम पाटील हे एक विश्वासू सहकारी होते.

1980च्या दशकात या पारसिक बँकेने सामाजिक वनीकरणाच्या भूमिकेतून पारसिक टेकडीवर वनीकरण सुरू केले, ते पाहण्यासाठी गोपीनाथरावांनी पत्रकार या नात्याने मलाही आमंत्रित केले होते.त्यावेळी जयराम पाटील यांना मी प्रथम पाहिले. पारसिक टेकडीवरील वनीकरणावर त्यानंतर रविवारच्या दै. लोकसत्तामध्ये मी एक लेख लिहिला. तो जयराम पाटील यांनाही आवडला होता.

जयराम पाटील हे उत्तम संघटक होते. पारसिक बँकेच्या जडण घडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच ते दोन वेळा त्या बँकेचे चेअरमन झाले. त्यांच्या कारकिर्दीत बँकेने अतिशय उत्तम प्रगती केली. कारण जयराम पाटील यांचा कळवा पंचक्रोशीत दांडगा जनसंपर्क होता. त्याचा त्यांना याकामी चांगला उपयोग झाला. समाजवादी विचारसरणीचा पगडा असलेल्या जयराम पाटील यांनी काही काळ मफतलाल कंपनीत नोकरी केली. कंपनी बंद पडली आणि त्यांच्यावर बेकारीची पाळी आली, पण ते डगमगले नाहीत. आलेल्या कठीण परिस्थितीला समर्थपणे तोंड देत कळवा, खारीगाव विभागात प्रजा समाजवादी पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी खूप कष्ट सोसले. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ताजी ताम्हणे हे त्यांचे राजकीय गुरू! गुरू आणि शिष्य या दोघांनीही हे नातं शेवटपर्यंत जपलं.

25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. त्यामुळे देशातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी होऊ लागली. त्याविरुद्ध सर्वत्र असंतोष पसरला. या वाढत्या असंतोषामुळे पुढे इंदिरा गांधी यांचा 1977 साली पराभव करून जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला. जयराम पाटील यांनी आपल्या कळवा खारीगाव भागात जनता पक्षाचे काम जोमाने सुरू केले. दरम्यान, जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर यांनी देशभर पदयात्रा काढली. सार्‍या देशात या पदयात्रेचा मोठा गवगवा झाला. असंख्य लोक त्यात सहभागी झाले. ती पदयात्रा जेव्हा ठाण्यात आली, त्या वेळी या पदयात्रेचे स्वागत करण्याची जबाबदारी पक्षाने जयराम पाटील यांच्यावर, तर नवी मुंबईत स्वागत करण्याची जबाबदारी त्यांचे धाकटे बंधू व शेतकरी नेते दशरथदादा पाटील यांच्यावर सोपवली होती. या दोन्ही बंधूंनी ही जबाबदारी अतिशय प्रामाणिक व लोकांच्या जल्लोषात बजावली. 1977च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. पुढे 1978 साली ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. सहाजिकच जनता पक्षाने या निवडणुकीसाठी जयराम पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या जिल्हा परिषद मतदारसंघाचा कणन्कण माहीत असलेल्या पाटील यांनी काही दिवसांत हा मतदारसंघ आपल्या प्रचाराने पिंजून काढला, पण दुर्दैवाने केवळ 218 मतांनी त्यांचा पराभव झाला व काँग्रेसचे जनार्दन गौरी निवडून आले. म्हणून पाटील निराश झाले नाहीत. पक्षाचे काम व जनतेची सेवा त्यांनी अखंडपणे सुरू ठेवली.प्रजा समाजवादी व जनता पक्षाच्या माध्यमातून त्याचा अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी संपर्क आला. त्यात एस. एम. जोशी, मधू दंडवते, मृणाल गोरे, राजारामबापू पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राजारामबापू महाराष्ट्र जनता पक्षाचे असताना जयराम पाटील यांच्याशी त्यांचा सतत संपर्क असे. एकदा ठाण्याच्या दौर्‍यावर असताना बापू त्यांच्या घरी जेवायलाही आले होते. पुढे राजकारणापेक्षा त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व सहकार क्षेत्रात अधिक लक्ष घातले. त्याला कारणही तसंच होतं. सहकारक्षेत्रात ते ज्यांना आपला आदर्श मानत होते, त्या गोपीनाथराव पाटील यांनी त्यांना तसा सल्ला दिला होता.  जयरामभाऊ राजकारण दशरथदादा सांभाळतील, तुम्ही सामाजिक,सहकारात लक्ष घाला. गोपीनाथरावांचा हा सल्ला त्यांनी शिरसावंद्य मानून सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाक्षेत्राला त्यांनी प्राधान्य दिले.

तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी कळवा, खारीगावात जयभारत स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली. त्याचा अनेक तरुणांनी लाभ घेतला. त्यांना वाचनाची खूप आवड होती. वि. वा. शिरवाडकर, मधू लिमये, य. दि. फडके यांचे साहित्य ते आवडीने वाचत. साने गुरुजींच्या विचारांचा व त्यांच्या शिकवणुकीचा तर जयराम पाटील यांच्यावर फार मोठा पगडा होता. त्यामुळे खारी गावात ज्या वेळी त्यांनी वाचनालयाची स्थापना केली, त्या वाचनालयाला सानेगुरूजींचं नाव देऊन त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. स्त्री शिक्षणाची उद्गगाती सावित्रीबाई फुले यांच्या विषयीही त्यांना विशेष आस्था होती. त्यामुळे गावात त्यांनी पतसंस्था सुरू केली, त्या पतसंस्थेला सावित्रीबाईं फुले यांचे नाव दिले. कळवा पंचक्रोशीतील विविध सामाजिक कार्यातही ते आघाडीवर होते. खारी गावात साधना विद्यालय सुरू करण्यात त्यांनी बरेच परिश्रम घेतले. कला, सांस्कृतिक प्रतिष्ठानसारख्या अनेक सामाजिक, सांस्कृतिक, सहकारी संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.

कळवा, खारीगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील व त्यानंतरचे सरपंच माणिक पाटील या दोघांच्या कारकिर्दीत 11 वर्षे उपसरपंच असलेल्या जयराम पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक सुधारणा घडवून आणल्या. ते खारी गावातले पहिले मॅट्रीक. त्यामुळे गावात त्यांना विशेष मान होता, पण त्याचा त्यांनी कधी गैरफायदा घेतला नाही. उलट गावकर्‍यांच्या मदतीला ते नेहमीच धावून जात. त्यांच्या सुख-दुःखाशी समरस होत. आगरी समाजाविषयीही त्यांना विशेष आत्मियता होती. अखिल आगरी समाज परिषदेचे सहावे अधिवेशन कोपरखैरणे येथे झाले, त्या अधिवेशनाला ते आवर्जून उपस्थित होते. आगरी परिषदेचे अध्यक्ष शेतकरी नेते दशरथदादा पाटील यांचे ते मोठे बंधू.

कळवा, खारी गाव आज झपाट्याने बदलत आहे. शहरीकरणाचा साज त्यावर चढत आहे. भातशेती जाऊन तेथे सिमेंटचे इमले उभे राहात आहेत. अशा या बदलत्या काळातही जयराम पाटील व त्यांच्या बंधूंनी खारी गावात आपला दबदबा कायम राखला आहे.नगरसेवक उमेश पाटील हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणता येईल.खारीगावाच्या विकासासाठी पाटील बंधूंचे योगदान फार मोठे आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे जयराम पाटील यांच्या निधनाने या बंधूंचाच नव्हे तर सार्‍या खारीगावचा आधारवड कोसळला आहे. राजकीय, सहकार, क्रीडा क्षेत्रातील एका विचारवंतांची अचानक झालेली ही एक्झिट मनाला चटका लावून गेली. त्यांना अखिल आगरी समाज परिषदेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

-दीपक म्हात्रे, संपादक, आगरी दर्पण

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply