मुख्यमंत्री ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ’सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर राज्य सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आली. त्यामुळे सरकारची असूया आता दिसत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे मोगलांना संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे, त्याप्रमाणे सरकारी पक्षांना देवेंद्र फडणवीसांशिवाय कोणीच दिसत नाही, असा टोला या वेळी दरेकर यांनी हाणला.
केंद्र सरकारने कोविडच्या परिस्थितीमध्ये काय मदत केली याचा सविस्तर लेखा-जोखा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगून, फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा राज्य सरकारने कोरोनाचे नियोजन आणि त्याचे निर्मूलन करण्याकडे अधिक लक्ष व वेळ द्यावा, असा सल्ला दरेकर यांनी दिला आहे.
राज्यातील कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांना उपचार घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबींकडे फडणवीस यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.