Breaking News

रायगडात आघाडीत बिघाडी

नव्याची नवलाई सरल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सातत्याने खटके उडू लागले आहेत. असमन्वयाने सुरू झालेल्या नाराजीचे रूपांतर एव्हाना वाद-विवादात झाले असून, महाआघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्या परस्परविरोधी भूमिका प्रकर्षाने समोर येत आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद तर मुख्यमंत्र्यांपुढे पोहोचला. दुसरीकडे जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतील शाब्दिक युद्धही धगधगत आहे.

काही वेळा वैचारिक तत्त्वे बाजूला सारून सत्तेसाठी राजकीय पक्ष एकत्र येतात. तेव्हा ते आपल्या ध्येय-धोरणांना तिलांजली देतात, परंतु राजशकट हाकताना कसोटी लागते. अनेकदा वादही झडतात. तरीही वरिष्ठ नेते खूर्चीसाठी तडजोड करून पुढे जात असतात. यामध्ये पक्ष संघटनेसाठी अहोरात्र झटणार्‍या आणि वेळप्रसंगी रक्ताचे पाणी करणार्‍यांचा मात्र बळी जातो. अशीच गत सध्या रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे. रायगडचे लवचिक राजकारण हा सदैव संशोधनाचा विषय राहिलेला आहे. इथे कधी कोण एकत्र येतील आणि कधी कोण कुणापासून फारकत घेईल याचा काही नेम नसतो. याचा प्रत्यय जिल्ह्यातील नागरिकांना अनेकदा आलेला आहे. सध्या नवा राजकीय अंक रायगडवासीय अनुभवत आहेत. त्याला सुरुवात झाली ती आदिती तटकरे पालकमंत्री झाल्यापासून. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असतानाही मंत्रिपद हे एकमेव आमदार असलेल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले. त्यापाठोपाठ पालकमंत्रिपदाची माळही आदिती यांच्याच गळ्यात पडली. तेव्हापासून शिवसेना नेते अस्वस्थ आहेत. जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत पालकमंत्री डावलत असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. निसर्ग चक्रीवादळ मदतनिधी वाटपावेळी हा असंतोष उफाळून आला. यावरून शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी थेट पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावरून नवगणे आणि आदिती यांचे वडील व राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा खासदार सुनील तटकरे यांनी एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका-टिपण्णी केली होती.

सत्तेत असूनही काहीच पदरी पडत नसल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून हा विषय वरिष्ठांपर्यंत पोहोचला, पण राज्य पातळीवरील नेते सबुरीचे धोरण घ्यायला सांगत होते. परिस्थितीत काहीच फरक पडत नसल्याचा आरोप करीत शिवसेना नेत्यांनी आपल्या व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर अखेर या संदर्भात नुकतीच मुंबईत बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी उभय पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांना समन्वय साधून काम करा, अशी नेहमीची री ओढत निर्देशित केल्याचे कळते.

याच बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले. आधीच सक्षम व दिशाहीन नेतृत्वामुळे वरपासून खालपर्यंत काँग्रेस पक्ष संघटना गलितगात्र झालेली आहे. परस्पर निर्णय होत असल्याने राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. त्यानंतर राहुलबाबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून काँग्रेसलाही सामावून घेत राज्यकारभार करावा, असे सूचित केले होते. रायगड जिल्ह्यात तर महाआघाडीमध्ये काँग्रेस केवळ नावापुरती आहे. काँग्रेसवाल्यांना विचारले जात नसल्याने महाडचे माजी आमदार माणिक जगताप हे तटकरे कुटुंबीयांविरुद्ध जाहीरपणे आवाज उठवित असतात. त्याला खासदार सुनील तटकरेही प्रत्युत्तर देतात. आता विरोधाचा ‘बाण’ भात्यात शांत ठेवतानाच काँग्रेसला बाय बाय करीत ‘हात’ दाखवून त्यांचे बारा वाजविण्याचा ‘घडाळ्याचा’चा विचार दिसतो.

रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षही महाविकास आघाडीत समाविष्ट आहे. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून शेकाप हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे. शेकापची अवस्था सध्या दयनीय आहे. नांदेडमधील एकमेव आमदार वगळता त्यांचे अस्तित्व केवळ रायगडात तेही काही स्थानिक स्वराज्य संस्थांपुरते उरले आहे. भविष्यातील निवडणुकांसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची खरोखरच युती होणार असेल तर काँग्रेसबरोबरच शेकापलाही फाट्यावर मारल्यात जमा आहे. आधीच कोमात गेलेल्या शेकापसाठी हा फार मोठा धक्का ठरू शकतो. या नव्या युतीबाबत काहीही निर्णय न झाला नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे सांगत असले तरी जिल्ह्यातील राजकारणाचा आजवरचा इतिहास पाहता काँग्रेस आणि शेकाप त्यांच्यावर विश्वास ठेवणार का? तसेच आता या दोन पक्षांची पुढील भूमिका काय असणार, हे पाहणे रंजक ठरेल.

सद्यस्थितीत कोरोनाचे संकट दिवसागणिक गडद होत चालले आहे. या महामारीपासून जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यकर्त्यांनी एकवटून नेटाने प्रयत्न करणे अपेक्षित असताना, इथे आपपासातील नाराजी, वाद तसेच नव्या घडामोडींमध्ये सत्ताधारी महाआघाडीतील नेतेमंडळी गुरफटून गेली असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

-समाधान पाटील

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply