Breaking News

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

ज्येष्ठ नागरिकाला  साडेपाच लाखांचा गंडा

पनवेल : वार्ताहर

ऑनलाइन फसवणूक करणार्‍या टोळीने पेटीएम अकाऊंट अपडेट करण्याच्या बहाण्याने तळोजा भागात राहणार्‍या एका ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून पाच लाख 54 हजार रुपये दुसर्‍या बँक खात्यात वळती करुन त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. 

या प्रकरणात फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव टी. लक्ष्मण वेकंटेश्वर राव (63) असे असून ते पेटीएम कॉल सेंटरमधुन बोलत असल्याचे सांगुन संपर्क साधला. त्यानंतर या व्यक्तिने त्यांची समस्या तो सोडवू शकत नसल्याचे सांगुन त्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांना संपर्क साधतील असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच आर. के. शर्मा नावाच्या व्यक्तिने पेटीएममधील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून टी. वेंकटेश्वर यांच्याशी संपर्क साधला.

शर्मा याने टी. वेंकटेश्वर यांना पेटीएम अ‍ॅपबाबत तो जे सांगेल तसे करण्यास सांगितल्याने टी. वेंकटेश्वर यांनी त्याच्या सांगण्यानुसार पेटीएम अ‍ॅपमध्ये आपल्या बँकेच्या खात्याची तसेच डेबीट कार्डाची सर्व माहिती भरली. त्यानंतर भामट्या शर्मा याने वेंकटेश्वर यांच्या बँक खात्यातून तीन वेळा दोन लाख 46 हजार रुपयांची रक्कम आधारशिला नावाच्या खात्यात वळती करुन घेतली. त्यामुळे टी. वेंकटेश्वर यांनी शर्मा याला संपर्क साधल्यानंतर त्याने त्याचा आय् फोन असल्याने त्यांच्या खात्यातून डेबिड झालेली रक्कम त्यांच्या अकाऊंटवर परत येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर भामटया शर्माने टी. वेंकटेश्वर दुसर्‍या मोबाइल फोनवरुन क्वीक स्टार व एसबीआय युनो हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगुन त्यात त्यांना बँक खात्याची माहिती भरण्यास भाग पाडले.

त्यानंतर या भामट्याने टी. वेंकटेश्वर यांच्या बँक खात्यातून तीन वेळा 1-1 लाखाची अशी तीन लाख रुपयांची रक्कम दुसर्‍या खात्यात वळती करुन घेतली. त्यानंतर या भामट्याने टी. वेंकटेश्वर यांच्या दुसर्‍या बँक खात्यातून देखील आठ हजार 500 रुपये काढून घेतले. अशा पद्धतीने सदर टोळीने टी. वेंकटेश्वर यांच्या बँक खात्यातून तब्बल पाच लाख 54 हजाराची रक्कम काढून घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाच्या मदतीने तळोजा पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली.

पनवेल : बातमीदार

केवायसी अपडेट करण्यासाठी सांगून त्याद्वारे 85 हजार 930 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सेक्टर 7, खारघर येथील अरुणप्रसाद गौरीशंकर गुप्ता यांना त्यांच्या मोबाइलवर केवायसी अपडेट करण्यासाठी संदेश आलेला होता. त्यावर त्यांनी फोन केला असता क्यूएस अ‍ॅप मोबाइलवर डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. त्यानंतर समोरून त्यांना एक रुपया पेटीएम अकाऊंटमधून ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले असता दोन अकाऊंटमधून त्यांनी एक रुपये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला मात्र पैसे ट्रान्सफर झाले नाही. मात्र थोड्यावेळाने त्यांच्या दोन्ही अकाऊंटमधून एक-एक रुपये ट्रान्सफर झाले. थोड्यावेळाने त्यांनी त्यांचे बँकेचे मेसेज चेक केले असता त्यातून 85 हजार 930 रुपये डेबिट झाले असल्याचे त्यांना दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply