Breaking News

गणेशमूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका

पेण : प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अनेक मंडळांनी दीड ते पाच दिवसांच्या व लहान गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आर्थिक फटका गणेश मूर्तिकारांना बसणार आहे.

गणेशमूर्तीची उंची हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेवढी मूर्ती मोठी, तेवढी जास्त प्रसिद्धी आणि गर्दी हे समीकरण अनेक वर्षांपासून सुरू आहे. सुप्रसिद्ध मालिका वा चित्रपटातील धार्मिक व्यक्तिरेखांप्रमाणेही मूर्तींना मागणी असते. याशिवाय सुप्रसिद्ध गणपतींच्या प्रतिकृतींचेसुद्धा आकर्षण असते. ही आवड ओळखून कारागिर मूर्ती घडवितो, मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यावर शासनाने घातलेले निर्बंध लक्षात घेता अनेक गणपती मंडळांनी 10 दिवसांऐवजी दीड ते पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे  तसेच मिरवणुकीवर प्रतिबंध असल्याने कमी उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचेही अनेकांनी जाहीर केल्याने गणपती कारखानदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

घरगुती गणेशोत्सवातही मूर्त्यांची उंची आणि सजावट कमी होणार असल्याचे दिसते. त्यामुळे मूर्तीकारांनी आतापर्यंत घेतलेल्या अनेक ऑर्डर्स रद्द झाल्या असून, मिळू शकणार्‍या ऑर्डरची शाश्वती नाही. त्यामुळे यंदा मोठ्या गणपतीमूर्तींचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पुढल्या वर्षीपर्यंत जर जपून ठेवायच्या म्हटले, तरी तात्पुरती घेण्यात आलेल्या कारखान्याच्या जागेचे भाडे वर्षभर भरणे शक्य नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका मूर्तिकारांना बसला आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply